महिलांना पोटदुखी होण्यामागे 'या' समस्या असू शकतात कारणीभूत!

पोटात होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घेऊया पोटदुखीची काय कारणं असू शकतात.

Updated: Apr 27, 2022, 12:57 PM IST
महिलांना पोटदुखी होण्यामागे 'या' समस्या असू शकतात कारणीभूत! title=

मुंबई : आपल्या सर्वांना कधीना कधी पोटाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. महिलांना जर असा त्रास होत असेल तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. महिलांना होणाऱ्या पोटदुखीमागे अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे पोटात होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घेऊया पोटदुखीची काय कारणं असू शकतात.

ओवेरियन सिस्ट

जर महिलांच्या अंडाशयात सिस्ट असतील तर पोटात सूज, अनियमित पीरियड्स आणि ओटीपोटात वेदना होण्याच्या समस्या जाणवू लागतात. सिस्ट ज्यावेळी फुटतो तेव्हा तीव्र वेदना होतात. मासिक पाळीच्या वेदनामुळे, तुम्हाला पोट आणि कंबर दुखू शकतात. तर तुम्हाला याची लक्षणं जाणवली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पेल्विक इंफ्लामेटरी डिसीज

पेल्विक इंफ्लामेटरी डिसीजचा त्रास असल्यास पोटात दुखणं किंवा ओटीपोटात दुखण्याची समस्या जाणवू शकते. याशिवाय, पेल्विक इन्फ्लेमेटरीमुळे ताप येणं, मासिक पाळीच्या वेळी रक्त येणं, लघवी करताना जळजळ होणं इत्यादी समस्या असू शकतात. 

एक्टोपिक प्रेग्नेंसी

एक्टोपिक प्रेग्नेंसी असली तरीही पोटदुखी होऊ शकते. ही वेदना गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यात होते. एक्टोपिक गर्भधारणेमध्ये गर्भ गर्भाशयाच्या बाहेरील बाजूस असतो. ओटीपोटात दुखण्याव्यतिरिक्त, काही लक्षणे आहेत जी एक्टोपिक गर्भधारणा दर्शवतात जसं की, योनीमध्ये वेदना, ओटीपोटात क्रॅम्स, अशक्तपणा, चक्कर येणं, इत्यादी.