102 वर्षांच्या आजीचा कारनामा.. सोशल मीडियावर जोरदार चर्चा

14 हजार फूट उंचीवरून मारली उडी 

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये राहणाऱ्या 102 वर्षांच्या आजीने अजब कारनामा केला आहे. या आजीची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. स्कायडायव्हींग म्हणलं की आठवतं ते सळसळणारं रक्त. या अशा साहसी खेळांकरता हिंमत आणि जोशची गरज असते. आणि आपल्याला वाटतं की हा उत्साह आणि जोश फक्त तरूणाईत आहे. पण 102 वर्षांच्या आजीने हे खोटं ठरवलं आहे. 

102 वर्षांच्या आजीने एक भन्नाट कारनामा केला आहे. इरेना ओशिया असं नाव असलेल्या या आजीने तब्बल 14 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेत स्कायडायव्हींग केलं आहे. आजीच्या या विक्रमाने एक रेकॉर्ड रचला आहे. 

उडी मारल्यानंतर इरेना यांची गती 220 किमी/प्रती तास अशी होती. असं असतानाही त्यांनी यशस्वीरित्या लँडिंग केलं आहे. 30 मे 1916 मध्ये जन्मलेल्या इरेना यांनी या अगोदर दोन वेळा स्कायडायव्हींग केलं आहे.  

या अगोदर त्यांनी 100 वर्षांच्या झाल्यावर असा कारनामा केला होता. तिसऱ्यांदा स्कायडायव्हींग करणं हे त्यांच्यासाठीच खूप मोठा सन्मान होता. त्यांचा विश्वास इतका दाणगा आहे की, पुढच्यावर्षी देखील डायव्हींग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

इरेना यांनी सांगितलं की, त्यांनी स्कायडायव्हींग हे कोणत्या रेकॉर्डसाठी केलेलं नाही तर याच्या माध्यमातून त्या मोटर न्यूरॉन या आजारावर संशोधन करण्यासाठी पैसे जमा करत आहे. 

आजींच्या 67 वर्षांच्या मुलगी याच आजाराने निधन झाले. 10 वर्षांपूर्वी आपल्या मुलीला गमावलेल्या या आजीने या आजारावर संशोधन करण्यासाठी पैसे जमा करण्याचा निश्चय केला. 

2016 मध्ये केलेल्या स्कायडायव्हींगमधून त्यांनी 12 हजार डॉलर म्हणजे जवळपास 8.5 लाख रुपये जमा केले. या स्कायडायव्हींगमधूनही त्या 10 हजार डॉलर म्हणजे 7.2 लाख रुपये जमा करण्याचा मानस आहे.