जगभरात कोरोनामुळे जवळपास ४ लाख लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच...

Updated: Jun 8, 2020, 08:10 AM IST
जगभरात कोरोनामुळे जवळपास ४ लाख लोकांचा मृत्यू  title=

मुंबई : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. जगभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात मृतांची संख्या जवळपास चार लाखांपर्यंत पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरातील 3,99,642 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जगातील 68,89,889 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक ग्रस्त देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 1.07 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर, कोरोनामुळे 40,000 पेक्षा जास्त मृत्यू झालेला ब्रिटन दुसर्‍या क्रमांकावर आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत इटलीमध्ये 33000, ब्राझीलमध्ये 32000, फ्रान्समध्ये 29000, स्पेनमधील 27000, मेक्सिकोमधील 11000 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याव्यतिरिक्त, बेल्जियममध्ये 9500, जर्मनीमध्ये 8600, इराणमध्ये 8000 आणि कॅनडामध्ये 7500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या जवळपास 19 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये 5.84 लाखांहून अधिक, रशियामध्ये 3.3 लाख, ब्रिटनमध्ये 2.8 लाख, स्पेनमधील 2.4 लाख आणि इटलीमध्ये 2.33 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पेरूमध्ये 1.79 लाख, तुर्कीमध्ये 1.67 लाख आणि इराणमध्ये 1.60 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे 6642 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची 2,36,657 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने देशात लॉकडाउन लागू केले. दोन महिन्यांहून अधिक काळानंतर लॉकडाऊन शिथिल केले जात आहे. पण कोरोनावर ब्रेक झाल्यासारखे दिसत नाही.