20 वर्षीय तरुणीला पेट्रोल पिण्याचं व्यसन! म्हणाली, 'यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो पण..'

Petrol Drinking Addiction: या तरुणीने तिला पेट्रोल पिण्याची सवय कशी लागली यासंदर्भातील खुलासाही केला आहे. तिला पेट्रोल प्यायलयाने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दलची पूर्ण कल्पना आहे असं तिचं म्हणणं असलं तरी हे व्यसन काही सोडवत नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 11, 2024, 08:13 AM IST
20 वर्षीय तरुणीला पेट्रोल पिण्याचं व्यसन! म्हणाली, 'यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो पण..' title=
डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा (फोटो सौजन्य - टीएसली युट्यूब चॅनेलवरुन साभार)

Petrol Drinking Addiction: आतापर्यंत तुम्ही दारुचं व्यसन, सिगारेटचं व्यसनाबद्दल ऐकलं किंवा वाचललं असेल किंवा अगदी तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती अशा व्यसनांच्या आधीन गेलेलं पाहिलं असेल. मात्र एका महिलेला चक्क पेट्रोल पिण्याचं विचित्र व्यसन जडलं आहे. पेट्रोल प्यायल्याने माझा मानसिक ताण कमी होतो असं या तरुणीचं म्हणणं आहे. अशाप्रकारे पेट्रोल प्यायल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकता असा इशारा डॉक्टरांनी अनेकदा या महिलेला दिला आहे. अशीच पेट्रोल पीत राहिलीस तर यामुळे तुझा मृत्यू होईल इथपर्यंत डॉक्टरांनी या महिलेला सांगितलं आहे. मात्र या 20 वर्षीय शेनॉन नावाच्या तरुणीला पेट्रोलचं व्यसन सोडता येत नाहीये. 

डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा: प्राणही जाऊ शकतो

कॅनडामधील ओंटारिओ प्रांतात राणारी शेनॉन रोज सकाळी उठल्यानंतर तीच्या बाथरुममध्ये ठेवलेला लाल रंगाचा पेट्रोलचा प्लास्टीकचा डब्बा तोंडाला लावते, असं 'द सन'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या सेवानाने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पेट्रोल प्यायल्याने उलट्या होण्याच्या त्रासबरोबर पोटदुखी, गुंगी येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिर्घकालीन परिणामांबद्दल बोलायचं झालं तर अन्ननलिकेला अंतर्गत दुखापत होणे, हृदयावर परिणाम होणे आणि फुफ्फुसं निकामी होणे यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. पेट्रोल शरीरामध्ये गेल्यानंतर विषासारखं काम करतं म्हणून चुकूनही पेट्रोल पिऊ नये असं डॉक्टर सुचवतात.

'माझा मृत्यूही होऊ शकतो पण...'

शेनॉनने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या सेवनाचे दुष्परिणाम तिला ठाऊक आहे. तिलाही छातीत दुखणं, ग्लानी येणं यासारखा त्रास या सवयीमुळे होतो. मात्र आपल्याला हे व्यसन सोडवत नसल्याचंही तिने मान्य केलं आहे. "ही सवय धोकादायक असल्याचा मला अंदाज आहे. यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो हे ही मला ठाऊक आहे. मात्र यानंतरही मला स्वत:ला थांबवता येत नाहीये," असं शेनॉन म्हणाली. "पेट्रोल चवीला गोड आणि थोडं कडवटही लागतं. आंबट सॉसप्रमाणे चव असते त्याची. पेट्रोल गिळताना घशात जळजळ होते," असंही शेनॉनने सांगितलं. 

'पेट्रोल प्यायल्याशिवाय एकही दिवस जात नाही'

"पेट्रोल प्यायल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. मी सकाळी झोपेतून उठल्यानंतर वॉशरुममध्ये जाऊन पेट्रोल पिते. मी बाहेर जाते तेव्हा छोट्या बाटलीमध्ये थोडं पेट्रोल सोबत घेऊन जाते," असं शेनॉनने सांगितलं. मागील वर्षभराहून अधिक काळापासून आपल्याला हे व्यसन लागलं आहे असं शेनॉनने सांगितलं आहे. आपण दररोज किमान 12 चमचे पेट्रोल पितो असंही तिने सांगितलं.

कशी लागली पेट्रोल पिण्याची सवय?

शेनॉनने दिलेल्या माहितीनुसार, तिला पेट्रोलचा वास लहानपणापासूनच आवडायचा. पेट्रोलचा वास घेता यावा म्हणून आईबरोबर कारमध्ये पेट्रोल भरायला गेल्यानंतर ती पेट्रोल भरताना मुद्दाम खाली उतरायची. यामधूनच तिला पेट्रोल पिण्याची सवय तारुण्यामध्ये लागली. आपल्याला एकटं आणि अपसेट वाटायचं त्यावेळी आपण पेट्रोल प्यायचो आणि यातूनच ही सवय जडली असं शेनॉन म्हणाली.