बँका, शेअर बाजारं, विमानं, Gmail सगळंच ठप्प; सायबर हल्ला की....; जगभरात हाहाकार

Microsoft Tech Glitch: दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर विमानांच्या वाहतुकीत अडचणी येत आहेत. ही समस्या समोर आल्यानंतर आकासा एअरलाइन्सने (Akasa Airlines) दिलेल्या माहितीत मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील त्यांच्या काही ऑनलाइन सेवा काही काळ बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.  

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2024, 02:13 PM IST
बँका, शेअर बाजारं, विमानं, Gmail सगळंच ठप्प; सायबर हल्ला की....; जगभरात हाहाकार title=

Microsoft Tech Glitch: जगभरात सायबर सेवा ठप्प झाल्याने मोठा फटका बसला आहे. मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्याना याचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, युकेसह भारतालाही याचा फटका बसला आहे. याचा अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. विमानसेवा, बँका, स्टॉक एक्स्चेंज, पेमेंट सिस्टम, दूरसंचार आणि आपत्कालीन सेवा, आरोग्य यंत्रणा आणि ब्रॉडकास्टर सेवा ठप्प पडल्या आहेत. सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म CrowdStrike मधील समस्यांमुळे सेवा प्रभावित झाल्या आहेत. हा सायबर हल्ला असल्याची भिती व्यक्त होत आहे. 

74 टक्के युजर्सला लॉग इन कऱण्यात अडचण येत आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने यासंदर्भात आपातकालीन बैठक बोलावली आहे. युरोपमधील सर्वात मोठं विमानतळ अॅम्सटरडॅमही बंद पडलं आहे. प्रभावित झालेल्या मोठ्या विमानतळांमध्ये दिल्ली, सिडनी, मुंबईचाही समावेश आहे. केंद्र सरकार या सर्व घटनांवर नजर ठेवून आहेत. माहिती मंत्रायल मायक्रोसॉफ्टच्या संपर्कात आहे.

जर तुम्ही आज विमानाने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठीही ही बातमी महत्त्वाची आहे. जगभरात मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) क्लाऊड सर्व्हिसमध्ये अडचण आल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. क्लाऊड सिस्टममध्ये तांत्रिक अडचण आल्याने सर्व विमान कंपन्यांनी उड्डाणं रद्द केली आहेत. अनेक विमानांना तर उड्डाण करण्याआधीच रोखण्यात आलं आहे. या सगळ्या दरम्यान, आकासा एअर, इंडिगो आणि स्पाईसजेट एअरलाईन्सने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. इंडिगोने ट्विट केले आहे की, मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील त्रुटीमुळे आमच्या सिस्टमवर परिणाम झाला आहे. त्यामुळे इतर कंपन्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळात फ्लाइट बुकिंग, चेक-इन, बोर्डिंग पास आणि काही फ्लाइट्सवरही परिणाम होऊ शकतो.

ऑनलाइन सर्व्हिस काही वेळासाठी बंद राहणार

दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर विमानांच्या वाहतुकीत अडचणी येत आहेत. आकासा एअरलाइन्सने दिलेल्या माहितीत, मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील त्यांच्या काही ऑनलाइन सेवा काही काळ बंद राहतील. 'आम्हाला सेवा प्रदान करणाऱ्यांना येणाऱ्या काही तांत्रिक समस्येमुळे, ऑनलाइन बुकिंग, चेक-इन आणि बुकिंग व्यवस्थापन यांसारख्या सेवा काही काळासाठी बंद राहतील.' एअरलाइन्सकडून असेही सांगण्यात आले की, 'सध्या विमानतळावर चेक इन आणि बोर्डिंगची प्रक्रिया मॅन्युअली केली जात आहे'.

समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न

आकासा एअरलाइन्सने सांगितलं आहे की, ज्या प्रवाशांची उड्डाणं लवकर आहेत त्यांनी काउंटरवर चेक-इन करण्यासाठी वेळेवर विमानतळावर पोहोचावं. एअरलाइनने सांगितलं की, आम्ही या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत आणि आमची टीम ही समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी सेवा प्रदात्यासोबत काम करत आहे.

अमेरिकेत सगळं ठप्प

अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्सला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवेतील समस्यांमुळे एअरलाइन्सला दोन तासांहून अधिक काळ विमानं रोखावी लागली आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यावर देशभरातील उड्डाणे बंद करण्याचा आदेश मागे घेण्यात आला. या समस्येमुळे बुकिंग आणि आरक्षण व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अमेरिकेची दुसरी एअरलाईन एलिजियंट एअरलाही अडचणींचा सामना करावा लागला आहे. कंपनीने सांगितले की त्यांना बुकिंग आणि आरक्षण प्रणालीमध्ये समस्या येत आहेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे, Sun Country Airlines Holdings Inc ने जगभरात समस्या जाणवत असल्याचं सांगितलं. 

मायक्रोसॉफ्टने काय म्हटलं?

या समस्येवर मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की, सेवेतील समस्या संध्याकाळी 6 च्या सुमारास सुरू झाल्या आहेत  अमेरिकेच्या मघ्य प्रदेशात Azure सेवा वापरणाऱ्या काही ग्राहकांना समस्या आल्या.