...तर पाकिस्तानात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहणार नाहीत

पाकिस्तानमधील डॉक्टरांचा पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा

Updated: Apr 24, 2020, 08:28 PM IST
...तर पाकिस्तानात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहणार नाहीत title=

ब्युरो रिपोर्ट :  जगभरात कोरोना लॉकडाऊनमध्ये आजपासून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमझान महिन्याला सुरुवात झाली असून पाकिस्तानात मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल करून मिशिदी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानातील डॉक्टर आणि काही लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा धोका वाढेल असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे धार्मिक स्थळांवर प्रार्थनेसाठी निर्बंध घालण्यात आले होते. पण मौलवींनी असे निर्बंध घालण्यास विरोध केला तर अनेक ठिकाणी पोलीस आणि मुस्लिम भाविकांमध्ये वाद झाला. मौलवींच्या दबावापुढे झुकत अखेर सरकारने १८ एप्रिलपासून मशिदीसह धार्मिक स्थळांवर प्रार्थनेसाठी घातलेले निर्बंध उठवले. निर्बंध उठवताना सरकार आणि मौलवींमध्ये २० कलमी करार करण्यात आला आहे. त्यात मशिदीत नमाज पठण करताना किती अंतरावर उभे राहावे, स्वच्छतेची काय काळजी घ्यावी आदी उपाययोजनाही ठरवण्यात आल्या आहेत. पण पाकिस्तानमधील डॉक्टरांनी मात्र निर्बंध उठवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

दुर्दैवाने पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. आमच्या मौलवींना गांभीर्य कळलेलं नाही, अशी टीका पाकिस्तान मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस कैसर सज्जाद यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. सरकार आणि मौलवींमध्ये बनवलेला २० कलमी कार्यक्रम व्यावहारिक नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. सरकारने घेतलेला निर्णय लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे. हे युद्ध कोरोना व्हायरस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये आहे आणि मौलवी धार्मिक मुद्दा समजून त्यावर मार्गदर्शन करत आहेत, अशी टीका डॉक्टर सज्जाद यांनी केली. कराराचं पालन न करणाऱ्या मशिदींवर कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे. पण तोपर्यंत उशीर झालेला असेल, आणखी १० दिवसांनी कोरोना रुग्णांसाठी बेड आणि व्हँटिलेटरही शिल्लक नसतील, असा इशाराही त्यांनी दिला.

पाकिस्तानचं सर्वात मोठं शहर कराचीमधील कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर आहे आणि कराचीतील हॉस्पिटलची क्षमताही संपली आहे. याच वेगाने कोरोना वाढला तर काही दिवसांत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारावा लागेल, कारण हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसतील, असं आरोग्यशास्त्राचे प्राध्यापक साद नियाझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पाकिस्तानात लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, जोपर्यंत कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात येत नाही तोपर्यंत उद्योगांनीही नुकसान सहन करावं अशी मागणी पाकिस्तानातील डॉक्टरांनी केली आहे.

पाकिस्तानात रमझानच्या महिन्यात मशिदींना कोट्यवधींची देणगी मिळते. त्यामुळेच मौलवींनी लॉकडाऊन असतानाही मशिदी चालू ठेवण्याचा आग्रह धरल्याचं म्हटलं जातं.

 

पाकिस्तानात कोरोनाचे दहा हजारावर रुग्ण आहेत आणि २०० हून अधिक बळी गेले आहेत.