नवी दिल्ली - ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉनमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. ऍमेझॉनमध्ये सध्या १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार भारतातच सर्वात मोठी भरती करण्यात येते आहे. भरतीसाठी काढण्यात आलेल्या जागांमध्ये भारतानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनच्या तिप्पट कर्मचारी भारतामध्ये घेण्यात येणार आहेत. ऍमेझॉनचे मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे. पण अमेरिका आणि जर्मनीनंतर आता भारतातच ऍमेझॉनचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतील.
भारतामध्ये लवकरच १२८६ जागा भरण्यात येणार आहेत. त्यानंतर चीनमध्ये ४६७, जपानमध्ये ३८१, ऑस्ट्रेलियामध्ये २५० तर सिंगापूरमध्ये १७४ जागा भरण्यात येणार आहेत. ऍमेझॉनकडून ई-कॉमर्स आणि क्लाऊड बिझनेस या दोन्हींचा विस्तार करण्यात येतो आहे. त्यासाठीच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येते आहे. पेमेंट, काँटेंट, व्हाईस असिस्टंट, फूड रिटेल आणि ग्राहक सेवा या क्षेत्रामध्ये कंपनीकडून विस्तार करण्यात येणार आहे. गतवर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीने ६० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. सध्या ऍमेझॉनकडे ६.१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट ऍण्ड मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, मशीन लर्निंग, क्लालिटी चेक, काँटेट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टुडिओ ऍण्ड फोटोग्राफी या विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. ऍमेझॉन भारतात फूड रिटेलिंग प्रॉडक्टसवर ५०० डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
ऍमेझॉनकडून येत्या २० ते २३ जानेवारी दरम्यान ग्रेट इंडियन सेलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. विविध लॅपटॉप आणि मोबाईलवरही या काळात ग्राहकांना मोठी सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर एचडीएफसीच्या कार्ड्सवर १० टक्के तात्काळ डिस्काऊंट दिला जाईल.