Afganistan Crisis : अफगाणिस्तान मुद्द्यावर Joe Biden नी अखेर मौन सोडलं; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...

तुम्ही न लढताच कसा पळ काढता, बायडन यांचा सवाल....

Updated: Aug 17, 2021, 07:09 AM IST
Afganistan Crisis : अफगाणिस्तान मुद्द्यावर Joe Biden नी अखेर मौन सोडलं; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले... title=

Afganistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये तालिबाननं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यानंतर या देशातून सैन्य हटवणाऱ्या अमेरिकेला परिस्थितीसाठी जबाबदार ठरवण्यात आलं. अनेकांनीच अमेरिकेच्या या निर्णयावर तीव्र नाराजीही व्यक्त केली. जागतिक स्तरावर होणारा विरोध आणि विश्वासघात केल्याचं म्हणत होणारे आरोप पाहता राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US president joe biden) यांनी मंगळवारी अखेर या मुद्द्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

अफगाणिस्तान (Afganistan Crisis) संकटावर संबोधित करताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे ठामपणे मांडत आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम दिसले शिवाय त्यांनी या निर्णयाला दुरोजाराही दिला. अमेरिकेनं या प्रकरणामध्ये बरीच तडजोड केली आणि ज्याचा परिणाम आता देशाच्या संसाधनानंवर दिसून येत असल्याचं बायडन म्हणाले.

तालिबाननं अफगाणिस्तान हिसकावून घेण्यासाठी सर्वस्वी अशरफ गनी जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी देशाच्या, देशवासियांच्या मदतीसाठी ठामपणे उभं राहणं अपेक्षित होतं, असं ते म्हणाले. अफगाणिस्तान सैन्यानं न लढता घेतलेली माघार पाहून जो बायडन यांनी सडकून टीका केली. 'न लढताच त्यांनी माघार घेतली. त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता, की तुम्ही न लढताच पळ कसा काढला', असं बायडन यांनी म्हटलं.

माझ्या निर्णयावर मी ठाम आहे...

अमेरिकेच्या सैन्यानं अफगाणिस्तानातून माघार घेणं याकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं आणि त्यावर साऱ्या जगातून प्रतिक्रियाही उमटल्या. यावरच आपली बाजू मांडताना बायडन यांनी आपल्या निर्णयाची पाठराखण केली. 'मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची योग्य वेळी कधीही नसेल हे जाणत असूनही मी 20 वर्षांनी हा निर्णय घेतला. धोका पत्करला. तालिबान अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित करेल याचा आम्हाला अंदाज होता, पण हे सारं इतक्या कमी वेळात होईल याची आम्हालाही अपेक्षा नव्हती.

दहशतवादाचा समूळ नाश करण्यात आम्ही मोठं योगदान दिलं...

दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपण मोठं योगदान दिलं असून, राष्ट्रपती म्हणून अनेक कठोर निर्णयही आपल्याला घ्यावे लागले, असं बायडन यांनी स्पष्ट केलं. 'जवळपास 20 वर्षांपासून आमचं सैन्य तेथे लढत होतं. लोकांनी म्हटलं की आम्ही त्यांच्यापुढे हात टेकले, ही मोहिम मध्येच सोडली. पण, आम्ही योग्य तोच निर्णय घेतला. आम्हाला आणखी लोकांना मरणाच्या तोंडी सोडायचं नव्हतं. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही प्रस्थापित करणं आमचं स्वप्न होतं. पण, देशात परिस्थिती अचानकच बदलली आणि याचे थेट परिणाम इतर देशांवरही दिसून आले.'