वॉशिंग्टन : महासत्ता अमेरिकाचा तसा अवघ्या जगावर वचक. त्यामुळे अमेरिकेसारखे सर्वच बाबतीत संपन्न राष्ट्र कोणाला घाबरेल हा विचार सुद्धा विनोद वाटण्याची शक्यता. पण, असे चित्र आहे खरे. महासत्ता अमेरिकेच्या मनात उत्तर कोरियाच्या दहशतीने चांगलेच घर केल्याचे जाणवते.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पीओ यांनी बीबीसीला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ही दहशत प्रकर्शाने जाणवते. पॉम्पीओ यांनी मुलाखती दरम्यान, म्हटले आहे की, सनकी किम जोंगच्या उत्तर कोरियापासून असलेल्या धोक्याविषयी अमेरिका नेहमीच सतर्क असतो. आमच्या गुप्तचर यंत्रणेमध्येही त्यावर वारंवार चर्चा होत असते. प्रामुख्याने ही चर्चा उत्तर कोरिया अमेरिकेवर हल्ला करु शकेल काय? उत्तर कोरिया तशा काही संशयास्पद हालचाली करतो आहे का? याबाबत आम्ही नजर ठेऊन असतो.
पुढे बोलताना पॉम्पिओ म्हणाले, उत्तर कोरियाच्या संशयास्पद हालचालींची माहिती राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी आमच्यावर असते. या माहितीत आम्ही सतत अपडेट असतो जेणेकरून संभाव्य संकटाचा सामना समर्थपणे करता येऊ शकेल, असेही पॉम्पिओ यांनी मुलाखतीत सांगितले.
उत्तर कोरियाविरोधात अमेरिका सैन्यबळाचा वापर करू शकते काय? याबाबतही पॉम्पिओ यांनी सुतोवाच केले. उत्तर कोरियाविरोधात अमेरिका सैन्यबळाचा वापर करते तर, मोठ्या प्रमाणावर जिवीतहानीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे उत्तर कोरियाच्या नेतृत्वपदावरून किमला हटवणे तसेच, उत्तर कोरियाच्या अतिअन्वस्त्रसज्जतेला आळा घालणे यासाठी अमेरिकेकडे अनेक पर्याय आहेत. हुकूमशहा किम जोंग उन हा नेहमीच शक्तिप्रदर्शन करत असतो. शक्तिप्रदर्शनाच्या जोरावर तो विरोधी देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच तर, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जापान संयुक्तपणे युद्धसराव करत असतात, अशी टीप्पणी पॉम्पीओ यांनी केली.