Bangladesh Violence: जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामचे लाखो करोडो यूजर्स आहेत. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम आता माणासाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. आता अनेक महत्त्वाच्या कामांसाठीही या अॅप्सचा वापर करण्यात येतो. हे एक दिवस जरी बंद असेल तरी यूजर्सची तारांबळ उडते. मात्र, भारताशेजारच्याच एका देशाने व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यासारख्या अॅपवर बंदी घातली आहे. त्यामुळं आता या देशातील नागरिकांना हे सोशल अॅप्स वापरता येणार नाहीयेत. बांग्लादेशने त्यांच्या नागरिकांना हे लोकप्रिय अॅप्स वापरण्यावर बंदी घातली आहे. यात इन्स्टाग्राम, टिक टॉक, युट्यूब आणि व्हॉट्सअॅप यांचा समावेश आहे. शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरली असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून बांगलादेश सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानुसार शेख हसीना सरकारने इंस्टाग्राम, युट्यूब,टिकटॉक, व्हॉट्सअॅपसहीत इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये शुक्रवारपासूनच सर्व सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे. मेटा प्लॅटफॉर्मचे नेटवर्क सिमित करण्यात आले आहेत. तसेच इंटरनेट स्पीडदेखील स्लो करण्यात आले आहे. व्हीपीएनचा वापर करुनदेखील कोणाला सोशल मीडियाचा वापर करता येत नाहीय. सर्वात आधी 17 जुलैला इंटरने बंद करण्यात आले होते. यानंतर 18 जुलैला ब्रॉडबॅण्ड इंटरनेटदेखील बंद करण्यात आले होते. याआधी तुर्कीने अशाप्रकारे निर्णय घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रतिबंधित केले होते. 28 जुलैला मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले होते. ग्लोबल आईजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
बांगलादेशची राजधानी ढाकाच्या विविध भागांमध्ये 2 हजारहून अधिक आंदोलक आंदोलन करत आहेत. यामध्ये काही लोक हुकूमशाही मु्र्दाबाद आणि पिडितांना न्याय देण्याचे नारे लगावत आहेत. पोलिसांनी आंदोलकांना चारही बाजुंनी घेरले आहे. ढाकाच्या उत्तरा भागात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रू धूर आणि स्टन ग्रेनेड सोडत कारवाई केली.
पंतप्रधान हसीना शेख यांचे सरकार मागच्या महिन्यापासून आंदोलकांचा सामना करत आहे. अद्यापही हे आंदोलन शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीयत. 15 जुलैला हिंसाचार झाल्यानंतर शेख हसीनांच्या विरोधात मोठा जनक्षोभ उसळलाय. यातून मार्ग काढण्यासाठी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच पाहता क्षणी गोळी मारण्याचे आदेश देत कर्फ्यू लावण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर येथे शाळा आणि कॉलेजदेखील बंद ठेवण्यात आली आहेत.