Kuwait Building Fire Latest Updates: कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षां अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 49 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
#Kuwait Mangaf Fire: Initial causes indicate poor storage on the ground floor and the presence of many gas cylinders, Firefighters, MOI and MOH to assess the deaths and injuries.. #الكويت pic.twitter.com/LNCpkhZdae
— Ayman Mat News (@AymanMatNews) June 12, 2024
कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी पहाटे सहा मजली इमारतीला आग लगाली. हा परिसर लेबर कॅम्प म्हणून ओळखला जातो. ज्या इमारतीत ही आग लागली त्या इमारतीत राहणारे बहुसंख्य कामगार हे भारतीय होते. या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते. हे सर्व एकाच कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.
कुवेतमधील भारतीय दूतावासाने सोशल मिडियावर पोस्ट करत या दुर्घटनेची माहिती दिली आहे. भारतीय दूतावासाने जखमींना तात्काळ मदत मिळावी तसेच दुर्घटनाग्रस्तांशी संपर्क साधता यावा यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. +965-65505246 या हेल्पलाइनशी संपर्क साधावा असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. कुवेतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वैका यांनी अल-एडेन रुग्णालयाला भेट दिली. जखमी झालेल्या 30 हून अधिक भारतीय मजुरांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.