British Royal Family : ब्रिटनच्या राजघराण्याकडून राणीच्या निधनापश्चात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या वर्षी 6 मे रोजी वेस्टमिंस्टर अॅबीमध्ये (Queen Elizabeth 2) राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र किंग चार्ल्स तृतीय (king charles iii) यांचा राज्याभिषेक केला जाणार आहे. यावेळी परंपरेनुसार सुरु असणारे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. राजा म्हणून चार्ल्स सिंहासनारुढ झाल्यानंतर त्यांना मानाचा मुकूटही घालण्यात येईल. सोबतच त्यांची पत्नी कॅमिला पार्कर (Camilla Parker) यांनाही एक मुकूट देण्यात येणार आहे. असं असलं तरीही या राज्याभिषेकापूर्वी एक मोठा निर्णय ब्रिटनच्या राजघराण्याकडून घेण्यात आला आहे. याचे सूत भारताशी जोडण्यात येत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार कॅमिला यांना तो मुकूट देण्यात येणार होता ज्यामध्ये भारतीय ज्यावर हक्क सांगतात तो कोहिनूर हिरा जडवण्यात आला आहे. पण, आता मात्र तसं होणार नाही, कारण कॅमिला आणि चार्ल्स यांच्यात एक गुप्त करार झाल्याचं कळत आहे. ज्यामध्ये दिवंगत राणीच्या या मौल्यवान मुकूटाचा उल्लेख आहे.
राणीच्या निधनानंतर नेमकं काय झालं?
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारताकडून कोहिनूर परत करण्याची मागणी वारंवार केली जाऊ लागली. या प्रकरणाला राजकीय किनारही मिळाली. या सर्व घटना पाहता कॅमिला पार्कर यांनी कोहिनूर असणारा मुकूट परिधान करण्यास नकार दिला आहे. यापूर्वी राणीचा कोहिनूरजडित मुकूट क्वीन कोनसोर्ट (Queen Consort) कॅमिला यांच्याकडेच जाणार होता. खुद्द राजापदी विराजमान होणारे चार्ल्स आणि त्यांचे सल्लागार यांच्यामध्ये या संवेदनशील मुद्द्यावर चर्चा झाली आणि ते या निर्णायावर पोहोचले.
मुकूट आणि राज्याभिषेकाची परंपरा
राज्याभिषेक आणि मुकूटाची परंपरा अतिशय जुनी आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीला याची सुरुवात झाली. रोमन साम्राज्यात कॉन्स्टेंटाइन द ग्रेटनं सजावट असणारा मुकूट घालण्याची सुरुवात केली. या परंपरेचं महत्त्वं पाहता ती पुढे सुरुच राहिली.