नवी दिल्ली : कुलभूषण जाधव kulbhushan jadhav प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करण्यास पाकिस्तान आडमुठी भूमिका घेत असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कुलभूषण जाधव हे पुनर्विचार याचिकेसाठी तयार नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. किंबहुना पाकिस्तानकडून त्यांना भारतीय वकील देण्यासही नकार देण्यात आला आहे.
पाकिस्ताननं केलेल्या दाव्यानुसार कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या कुलभूषण जाधव यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या अनुशंगानं पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे. याऐवजी त्यांनी दया याचिकेची मागणी केली आहे.
पाकिस्तानचे ऍडिशनल ऍटर्नी जनरल अहमद इरफान यांच्या म्हणण्यानुसार, कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंबंधी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करत असं करण्यास स्पष्ट नकार दिला.
२० मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आयसीजेकडून देण्यात आलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून एक अध्यादेश काढण्यात आला आहे. ज्या धर्तीवर त्यांनी दोन महिन्यांच्या आत इस्लामाबाद उच्च न्यायालयात अपील करणं अपेक्षित होतं. १७ जूनला जाधव यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्याची संधी देण्यात आली होती.