अमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे

Updated: Jul 8, 2020, 09:39 AM IST
अमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

वॉशिंग्टन : जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत एकूण ६०२०९ नवीन रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त १११४ मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या आता १.३१ लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या जवळपास ३१ लाखांवर आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या बाबतीत गेल्या एका आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे आणि दररोज सरासरी ५० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत जवळजवळ सर्व काही उघडलेले आहे आणि लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय वावरत आहेत.

तसेच अमेरिकेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या बर्‍यापैकी जास्त आहे. अमेरिका दररोज सुमारे ५ लाख चाचण्या करत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीस कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू अद्याप शिगेला पोहोचलेले नाही असे विधान केले होते. कारण आता अनेक देशांमध्ये चाचणी होत आहे. आता जगात दररोज १.८० लाखाहून अधिक रुग्ण वाढत आहेत. यातील बहुतेक रुग्ण हे अमेरिका, ब्राझील आणि भारतमधील आहेत. या तीन देशात एक लाखाहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे.

जगात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १.२० कोटींवर गेली आहे. ५.४६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.