Chandrayaan 3 Landing : एकिकडे संपूर्ण जग भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं (ISRO) कौतुक करत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या मंत्र्यांचं एक असं वक्तव्य समोर आलं, जे पाहून अनेकांचाच संताप अनावर झाला. 'बरे आहेत ना हे?' असे उपरोधिक प्रश्नही बऱ्याचजणांनी विचारले. कारण, हे तेच पाकचे मंत्री होते ज्यांनी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली होती. आता मात्र त्यांनी आपला सूर बदलला असून, चक्क या मोहिमेचं कौतुक केलं आहे. बरं जाहीरपणे थेट सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्यांनी हे कौतुक केल्यामुळं अनेकांनीच आता त्यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे.
फवाद हुसैन असं या पाकिस्तानी मंत्यांचं नाव. त्यांनी नुकतंच X च्या माध्यामातून चांद्रयान 3 मोहिमेविषयी प्रशंसेचे शब्द लिहिले. इतकंच नव्हे तर त्यांनी भारताचं आणि इस्रोचं अभिनंदनही केलं. इतक्यावरच न थांबता त्यांनी बुधवारी सायंकाळी पाकिस्तानाच चांद्रयान 3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण करण्याचं आवाहनही केलं.
हुसैन यांनी चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर म्हणजेच 14 जुलै 2023 रोजी इस्रोच्या तिसऱ्या चांद्रयान मोहिमेनिमित्तही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि क्षेत्राला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी काय ट्विट केलंय पाहा....
Pak media should show #Chandrayan moon landing live tomorrow at 6:15 PM… historic moment for Human kind specially for the people, scientists and Space community of India…. Many Congratulations
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) August 22, 2023
2019 मध्ये हुसैन यांनी भारताच्या चांद्रयान 2 ची खिल्ली उडवत सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर अनेकांनीच त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सोशल मीडियावर तर त्यांच्या विरोधात अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं होतं. तत्कालीन मोदी सरकारनं 900 कोटींचा खर्च केलेल्या या मोहिमेवर त्यांनी निशाणा साधला होता. 'फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात इतकी मोठी गुंतवणूक करणं योग्य निर्णय नाही', असं ते म्हणाले होते. ‘India Failed’ असा हॅशटॅगही त्यांनी X म्हणजेच तेव्हाच्या ट्विटरवरून ट्विट करत म्हटलं होतं.