इन्स्टाग्राम बंद पडल्याने नेटिझन्स नाराज, ट्विटरवर तक्रारी

तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले इन्स्टाग्राम ऍप मंगळवारी पहाटे बंद असल्याचे दिसले.

Updated: Jan 29, 2019, 08:59 AM IST
इन्स्टाग्राम बंद पडल्याने नेटिझन्स नाराज, ट्विटरवर तक्रारी title=

नवी दिल्ली - तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले इन्स्टाग्राम ऍप मंगळवारी पहाटे बंद असल्याचे दिसले. विविध देशांमधून ग्राहकांनी इन्स्टाग्राम सुरू होत नसल्याची तक्रार केली. इन्स्टाग्रामची मालकी फेसबुककडे आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकच्याच मालकीचे असलेले व्हॉट्सऍपही बंद पडल्याची तक्रार आली होती. त्यानंतर आता इन्स्टाग्राम सुरू होत नसल्याची तक्रार आल्यामुळे फेसबुकवर नामुष्कीची वेळ आली आहे. 

अनेक ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर इन्स्टाग्रामनेही तांत्रिक अडचण असल्याचे मान्य केले. ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये इन्स्टाग्रामने म्हटले आहे की, तांत्रिक कारणांमुळे काही ग्राहकांच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम सुरू होत नसल्याचे आम्हाला समजले आहे. ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या अडचणी आहेत, त्यावर काम सुरू असून, लवकरच इन्स्टाग्राम व्यवस्थित सुरू होईल. तांत्रिक अडचण पूर्णपणे दुरुस्त झाल्यावर आम्ही ग्राहकांना परत एकदा अपडेट माहिती देऊ. या ट्विटनंतर काही वेळाने इन्स्टाग्रामने आणखी एक ट्विट करून तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यात आली आहे. आणि आता इन्स्टाग्राम सुरळीतपणे सुरू असल्याचे ट्विट केले.

इन्स्टाग्राम सुरू होत नसल्याचे दिसल्यावर अनेक ग्राहकांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया व्यासपीठांच्या माध्यमातून त्याबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पहाटे ५.५१ वाजण्याच्या सुमारास इन्स्टाग्राम सुरू होत नसल्याचे अनेक ग्राहकांच्या लक्षात आले. त्यानंतर काहींनी याबद्दल सोशल मीडियावर लिहिण्यात सुरुवात केली. डाऊनडिटेक्टर डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३२ हजार ग्राहकांनी इन्स्टाग्राम सुरू होत नसल्याची तक्रार नोंदविली आहे.