कोरोनाशी लढण्याचा स्टायलिश मार्ग; पाहा फॅशन डिझायनरची कमाल....

आणखी एक किमया करत चीनने जगाचं लक्ष वेधलं आहे.   

Updated: May 19, 2020, 03:24 PM IST
कोरोनाशी लढण्याचा स्टायलिश मार्ग; पाहा फॅशन डिझायनरची कमाल....  title=
छाया सौजन्य- रॉयटर्स

बिजिंग : Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकांनीच शक्य त्या सर्व परिंने प्रतिबंधात्मक उपाय योजत त्या अनुशंगाने या फोफावणाऱ्या संसर्गाशी लढा देण्याचं सत्र सुरु ठेवलं आहे. त्यातच आता चीनमधून असं वृत्त समोर येत आहे, जे पाहता कोरोनाशी लढण्यासाठीचा एक नवा आमि तितकाच सकारात्मक मार्ग अवलंबात आणला जात असल्याची चर्चा आहे. 

ऑर्किड, कॅमलिया आणि चांगल्या नशिबासाठीची प्रतिकं असणाऱ्या अनेक चिन्हांचा वापर सध्या चीनमध्ये मास्कवर केला जात आहे. चीनी फॅशन डिझायनर Zhou Li ने ही किमया केली असून, कोरोनाशी लढण्यासाठीचा हा स्टायलिश आणि तितकाच सकारात्मक मार्ग सर्वांच्या भेटीला आणला आहे. 

'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार नुकत्याच पार पडलेल्या चायना फॅशन वीकमध्ये Zhou Li चा 'देजीन' नावाचा फॅशन ब्रँड सादर करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यापासून N95 फिल्टर्स असणाऱ्या या सिल्कच्या अर्थात रेशमी कापड असणाऱ्या मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या मास्कच्या निमित्ताने कोरोनापासून बचाव होण्यासोबतच फॅशनमधील नवा ट्रेंडही जपता येत आहे. 

'ज्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर वळणावर पोहोचली तेव्हा दर चार तासांनी मास्क बदलला जात असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली', असं म्हणत आपल्याला याच परिस्थितीतून पुन्हा वापरत्या येण्याजोगे रेशमी मास्क बनवण्याची कल्पना सुचल्याचं Zhou Li ने सांगितलं. 

 

सध्याच्या घडीला काही अंशा कोरोनाचा प्रादुर्भाव चीनसह काही राष्ट्रांमध्ये कमी होत आहे. परिणामी लॉकडाऊनही शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही मास्कचा वापर भविष्यातही केला गेलाच पाहिजे यासाठी Zhou Li आग्रही आहे. याच धर्तीवर तिनं उन्हाळ्याच्या दिवसांसाठी कमी जाडीच्या कापडाचा वापर करत मास्क तयार केले आहेत. Zhou Li ची कंपनी दिवसाला जवळपास ६०० मास्क बनवून त्याची ऑनलाईन विक्री करु शकते. येत्या काळाता या मास्कविषयीच्या जनजागृतीसाठी काही प्रसिद्ध चेहऱ्यांची मदतही घेणार आहे. कोरोना विषाणूशी सुरु असणारा लढा हा अतिशय गंभीर आहे. पण, अर्थात त्याला अशा कलेची आणि सकारात्मकतेची जोड मिळाल्यास हीच सकारात्मकता अनेकांच्या आयुष्यात काही अंशी बदल नक्की घडवेल असं म्हणायला हरकत नाही.