अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) नियंत्रणात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा ओसरता जोर पाहता राज्य सरकारने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेने परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल केले. भारताला तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचं सांगताच तिसऱ्या लाटेला आंमत्रण देऊ नका, असं आवाहनही राज्यातील नागरिकांना दिलं. संपूर्ण जगानं गेली दीड वर्ष कोरोनात घालवली आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2022 मध्ये तरी कोरोना हद्दपार व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र तसं होण्याची शक्यता कमी आहे. कारण एका संशोधनात असंच काही पुढे आलंय. (Corona virus Experts are warn about Covid 22 new corona virus variant know details)
पुढील वर्ष कोरोनामुळे अधिक बिकट होऊ शकतं, असं एक संशोधनातून पुढे आलं आहे. कोविड 22 (Covid 22) हा संभाव्य व्हायरस जगात धुमाकूळ घालू शकतो. त्याला रोखायचं असेल, तर लसीकरण आणि संशोधनाचा वेग वाढवावा लागणार आहे. कोविड 19 व्हायरस एअरबॉर्न होण्यासाठी स्वतःला झपाट्यानं म्युटेट करत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय.
स्वित्झर्लंडच्या फेडरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटनं यावर संशोधन केलंय. संस्थेमधले इम्युनॉलॉजिस्ट डॉ. साई रेड्डी यांनी कोरोनाचा सुपर व्हेरियंट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हा व्हेरियंट आला तर केवळ लसींवर विसंबून राहता येणार नसल्याचं ते सांगतायेत. रोग प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी हा व्हायरस म्युटेट झालेला असेल.
त्याचा सामना करण्यासाठी अधिक शक्तिशाली व्हॅक्सिन तयार करावं लागेल आणि जास्त काळजी घ्यावी लागेल, असंही डॉ रेड्डी यांनी म्हटलंय.
सध्या जगभरात कोविड-19चं लसीकरण सुरू असलं, तरी हा वेग कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कोविड व्हायरस ज्या वेगानं म्युटेट होतोय त्या वेगानं लसीकरण आणि संशोधन झालं नाही, कोविड-२२ चं थैमान अटळ आहे.