थट्टा नव्हे.... ; इथं मिळतंय 80 रुपयांपेक्षाही कमी दरात घर

या भागाला अतिशय सुरेख नैसर्गिक ठिकाणांची , निसर्गरम्य दृश्यांची देणगी लाभली आहे.   

Updated: Aug 25, 2021, 07:40 PM IST
थट्टा नव्हे.... ; इथं मिळतंय 80 रुपयांपेक्षाही कमी दरात घर title=
(छाया सौजन्य- vnexplorer)

मुंबई : समाधानकारक पगाराच्या श्रेणीत पोहोचल्यानंतर प्रत्येकाचीच स्वप्नांची यादी जरा मोठी होत जाते. या यादीत हमखास एक उल्लेख असतो आणि तो म्हणजे स्वत:चं घर. घर खरेदी करण्यासाठी अनेक निकषांचं नियोजन महत्त्वाचं ठरतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन. 

कित्येकदा घराची किंमत जास्त म्हणून या स्वप्नाला वेसण घालावं लागतं. पण आता बहुधा तसं करावं लागणार नाही. अर्थात यासाठी काही नियमांची पूर्तता करावी लागेल. ज्याच्या परफेडीच्या रुपात तुम्हाला अवघ्या 87 रुपयांत घर खरेदी करता येणार आहे. 

धक्का बसला ना? हे खरं आहे. इटलीमध्ये Maenza माएंझा येथे ही मालामाल ऑफर दिली जात असून, इथं अवघ्या एका युरो म्हणजेच जवळपास 87 रुपये किंमतीत घर खरेदी करता येणार आहे. एका बर्गरपेक्षाही हा दर कमी आहे. त्यामुळं आता बर्गर खायचा की घर घ्यायचं असाच प्रश्न तेथील नागरिकांना पडत असावा. 

बरं घर खरेदी केल्यानंतर फक्त एकच बाब तुम्हाला करावी लागणार आहे, ती म्हणजे त्या घराची डागडुजी. इटलीची राजधानी रोमपासून दक्षिणेकडे 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या Maenza माएंझा इथं सुरु असणाऱी ही घरांची विक्री संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

मागील वर्षीपासून इटलीमध्ये खेड्यांमधून कमी होणाऱ्या लोकसंख्येकडे पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. तेथील एका आदिवासी प्रजातीचं वास्तव्य़ असणाऱ्या या भागाला अतिशय सुरेख नैसर्गिक ठिकाणांची , निसर्गरम्य दृश्यांची देणगी लाभली आहे. 

माएंझा येथील शहर प्रमुख  Claudio Sperduti यांनी शहरामध्ये, खेड्यामध्ये नवी उर्जा आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. घराचे मुख्य मालक आणि जाहिरात क्षेत्रातील काही वेबसाईट्सच्या माध्यमातून यासंदर्भातील स्पष्ट आणि थटे जाहिराती करण्यात येत आहेत. आतापर्यंत या उपक्रमांमध्ये काहीच घरांचा समावेश आहे. पण, यानंतर यामध्ये आणखीही घरांचा समावेश असेल. 

घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं इथं वास्तव्य करावं अशी अट बंधनकारक नाही. पण, या घराचा वापर हॉटेल, रेस्तरॉ किंवा वास्तव्यापैकी कोणत्या कारणासाठी केला जाणार आहे किंवा तिथं आणखी काही सुरु करु इच्छित आहे का याबाबतचं चित्र स्पष्ट करणं अपेक्षित असेल.