कोरोना | अमेरिकेत केसेस वाढतायत, पण ट्रम्प अजूनही लॉकडाउन करायला का तयार नाहीत?

अमेरिकेत आणखी परिस्थिती खराब होत राहिली, तर ट्रम्प यांचं हे वक्तव्य कोणत्या दिशेला जाणार आहे, हे अजूनही समजू शकलेलं नाही.  

Updated: Mar 25, 2020, 06:05 PM IST
कोरोना | अमेरिकेत केसेस वाढतायत, पण ट्रम्प अजूनही लॉकडाउन करायला का तयार नाहीत? title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई: कोरोना व्हायरसवरून मोदी आणि ट्रम यांची भूमिका फार वेगवेगळी दिसतेय. मंगळवारी 24 मार्च रोजी रात्री आठ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देश लोकडाऊन करण्याची घोषणा केली. अनेक डॉक्टर आणि तज्ञ म्हणत आहेत, याशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नव्हता. उद्धव ठाकरे यांनी त्याआधीच महाराष्ट्र लॉकडाऊन केला होता. हे खूप मोठं धाडस या क्षणाला म्हणावं लागेल. दुसरीकडे अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळा विचार करणे सुरू ठेवले आहे. मोदींपेक्षा वेगळा विचार करताना ट्रम्प म्हणतात.  संपूर्ण देश लॉकडाऊन केला तर संपूर्ण देशाची वाट लागू शकते.

पण आता अमेरिकेत कोरोना व्हायरस फार वेगाने पसरतोय. जगभरात हा सर्व देशांसाठी चिंतेचा विषय आहे. मात्र दुसरीकडे ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे, पुढचा महिना हा अमेरिकेसाठी एक सर्वोत्तम काळ असेल. ट्रम्प यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं आहे. जेव्हा अमेरिका कोरोना व्हायरसचं जगातील सर्वात मोठं केंद्र बनण्याच्या दिशेने जात आहे.

अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमणाच्या 55 हजार केसेस समोर आल्या आहेत आणि आतापर्यंत 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात जवळजवळ वीस हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेने देखील लॉकडाऊनचा मार्ग अवलंबणे अपेक्षित होते. पण अजूनही समजत नाहीय. राष्ट्रपती ट्र्म्प यांना असा कोणता विश्वास आहे की ज्यामुळे अमेरिका 'लॉकडाउन'पासून वाचू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी फॉक्स न्यूजला इंटरव्यू दिला, यात त्यांनी असे म्हटले आहे, इस्टर येण्याआधी देशात सर्व काही व्यवस्थित होईल. इस्टर 12 एप्रिलला येतोय.

यावर आणखी बोलताना ही ट्रम्प म्हणाले, हा तर माझ्यासाठी खास दिवस असणार आहे. या दिवशी देशातील पूर्ण चर्च भरलेले असतील. पण पुढच्या वाक्यात त्यांची चिंता दिसून येते. ती अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात आपल्याला अनेक लोकांना मुकावे लागणार आहे. असं होऊ शकतं की हजारो लोक आत्महत्या करतील. देशात काहीही घडू शकतं. देशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. असं म्हणतात की राष्ट्रपती ट्रम्प देशातील आर्थिक मंदीमुळे होणाऱ्या नुकसानाविषयी चिंतेत आहेत. ट्रम्प यांना कोणताही निर्णय हा वास्तविक परिस्थितीच्या आधारावर घ्यायचा आहे.

अमेरिकेतील आजाराविषयी संबंधित अमेरिकेतील साथीच्या आजाराचे तज्ञ अँथनी यांनी म्हटलं आहे, न्यूयॉर्कमध्ये जे घडतंय त्याकडे कानाडोळा करता येणार नाही.  व्हाईट हाऊसमध्ये कोरोनावर जी समिती स्थापन करण्यात आली आहे, त्यातील ते एक सदस्य आहेत.

न्यूयॉर्कचा गवर्नर अन्ड्रू क्युमो आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात यावरून अनेकदा वाद झाले आहेत. क्युमो यांनी अनेक जास्तीच्या व्हेंटिलेटर ची मागणी केली आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे निर्बंध आणण्याच्या बाजूने दिसत नाहीत. पण अमेरिकेतील अनेक प्रांतातील लोकांनी लॉकडाउन केलंय.

मंगळवारपासून अमेरिकेत आतापर्यंत 17 प्रांत लॉकडाउन झाले आहेत. तर अमेरिकेत आणखी परिस्थिती खराब होत राहिली, तर ट्रम्प यांचं हे वक्तव्य कोणत्या दिशेला जाणार आहे, हे अजूनही समजू शकलेलं नाही.

ट्रम्प सरकारमधील अनेक लोकांनी सोशल डिस्टेंन्सची बाजू घेतली आहे. तर सोबत आर्थिक प्रभावांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिलाय. अमेरिका संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या दिशेने गेलेला नाही. काही प्रांतांकडून लॉकडाउन करण्याची मागणी होत आहे. यातही काही सूट देण्यात यावी, असे ट्रम्प यांना वाटतं. यावरून आणखी परिस्थिती कठीण होऊ शकते आणि बाकी प्रांतातील नागरिकही ट्रम्प यांच्याविरोधात येऊ शकतात.

सोमवारी पत्रकार परिषदेत, ट्रम्प म्हणाले जर आपण डॉक्टरांना सोडलं, तर आपण सर्व काही बंद करू शकतो. ते असंही म्हणतात की आपण जग बंद करू शकतो. आपण एखाद्या देशाशी असं करू शकत नाहीच, अशा वेळी जेव्हा आपण जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था आहोत.

सुपर पॉवर म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेसाठी ही एक महत्त्वाची वेळ आहे. किंबहुना ही अमेरिकेची सर्वात मोठी परीक्षा आहे. येणाऱ्या पुढच्या काळात त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की, अमेरिका कोरोना संकटातून कसं बाहेर येईल आणि अर्थव्यवस्था त्यांची नेहमीच कशी आघाडीवर असेल.