coronavirus : या देशांमध्ये काही निर्बंधांसह लॉकडाऊनच्या नियमांत सूट

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केला.  

Updated: Apr 27, 2020, 03:33 PM IST
coronavirus : या देशांमध्ये काही निर्बंधांसह लॉकडाऊनच्या नियमांत सूट title=

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केला. मात्र आता अनेक देशांवर लॉकडाऊनमुळे मोठं आर्थिक संकट घोंगावत आहे. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. स्थलांतरित मजूर, गरीब लोक मोठ्या संकटात आहेत. मात्र आता ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी आहे तेथे लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट देण्यात आली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये काही निर्बंधांसह लॉकडाऊनच्या नियमांत सूट देण्यात आली आहे. भारतात काही ठिकणी, काही निर्बंधांसह उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कोरोना प्रभावित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, तिथे कोणताही व्यवसाय, उद्योग सुरु करता येणार नाही.

श्रीलंकामध्ये महिनाभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गाचे नवे 46 रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा देशात 24 तासांचं लॉकडाऊन करण्यात आलं.

चीनच्या वुहानमध्ये अधिकाऱ्यांनी मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरु करण्यात आल्याचं सांगितलं. जवळपास अडीच महिने देश संपूर्ण लॉकडाऊन ठेवल्यानंतर आता कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये रविवारी 11 नवे कोरोना रुग्ण आढळले. मात्र त्यापैकी मृतांच्या आकड्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्येही मेच्या सुरुवातीपासून लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्याची तयारी सुरु करण्यात येत आहे.

ब्रिटनमध्ये लॉकडाऊनदरम्यान कोणतीही सूट देण्यात येण्याची योजना आखलेली नाही.

जॉर्जिया आणि ओकलाहामाने सलून, स्पा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. अलास्कामध्ये हॉटेलला तेथेच जेवणाची सुविधा सुरु करण्याची मंजूरी दिली आहे. येथे किरकोळ दुकानं आणि इतर व्यवसाय सुरु करण्यासाठी नियमांचं सक्तीने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.