Coronavirus : चोवीस तासांत अमेरिकेत १ हजारहून जास्त मृत्यू; तरीही एक दिलासा....

मृत्यूचं हे थैमान सुरु असतानाच... 

Updated: May 5, 2020, 07:08 AM IST
Coronavirus : चोवीस तासांत अमेरिकेत १ हजारहून जास्त मृत्यू; तरीही एक दिलासा....  title=
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन : Coronavirus कोरोना व्हायरस किंवा कोविड 19चा संपूर्ण जगभरात धुमाकूळ पाहायला मिळत आहे. चीनमधून सुरुवात झालेल्या या विषाणूचा संसर्ग पाहता पाहता संपूर्ण जगातील सुमारे १८७ राष्ट्रांमध्ये अगदी झपाट्यानं परसरला. मुख्य म्हणजे ज्या चीनमधून कोरोनाची सुरुवात झाली, तिथे आता परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत असतानाच महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला मात्र कोरोनापुढे हतबल व्हावं लागल्याचं पाहायला मिळत आहे.

अमेरिकेमध्ये दिवसागणिक हजारोंच्या संख्येने नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर, धडकी भरेल या संख्येने नागरिंकाचा या विषाणूशी झुंज देत असताना मृत्यूही होत आहे. या साऱ्यामध्ये अवघ्या काही क्षणांपूर्वीच एक दिलासा देणारं वृत्त पाहायला मिळालं. अर्थात आता मृत्यूचं हे थैमान सुरु असताना हा खरंच दिलासा आहे का असाही प्रश्नच. 

वाचा : 'कोरोनाच्या उत्पत्तीबाबत ठोस पुरावे' अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

जॉन हॉपकिन्स ट्रॅकर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या १,०१५ ने वाढली. मुख्य म्हणजे गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेत सुरु असणारं मृत्यूचं तांडव पाहता हा एका दिवसातील सर्वाधिक कमी मृत्यूदर असल्याची बाब यावेळी उघड झाली. 

 

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा अमेरिका आणि युरोपातील राष्ट्रांना बसल्याचं आता हाती येणारी आकडेवारी पाहून लक्षात येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ६८ हजारहून अधिकांना कोरोनामुळं जीव गमावावा लागला आहे. मुख्य म्हणजे मानवी जीवनासोबतच आता या साऱ्याचे थेट परिणाम हे जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे आता प्रथमत: कोरोनावर मात करत त्यानंतर अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेगही पूर्ववत आणण्याकडे अनेक राष्ट्रांचं लक्ष असेल.