अमेरिकेत कोरोनाचं थैमान; मृतांचा आकडा शंभरीपार

प्रशासनाकडून नागरिकांना आर्थिक मदत   

Updated: Mar 18, 2020, 11:00 AM IST
अमेरिकेत कोरोनाचं थैमान; मृतांचा आकडा शंभरीपार  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

वॉशिंग्टन : कोरोना Corona व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आता अमेरिकेपर्यंतही पोहोचला आहे. चीन, इराण, इराकमागोमाग आता अमेरिकेत फोफावणाऱ्या या कोरोनाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापुढेही काही आव्हानं ठेवली आहेत. पण, या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांचं प्रशासन सज्ज दिसत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमालीची सावधगिरीही बाळगली जात आहे. 

सतर्कता असतानाही अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत शंभरहून जास्त जणांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा वाढतच आहे. शिवाय कोरोनालीच लागण होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मदतीला थेट ट्रम्प सरकार धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कोरोनाशी झुंज देण्यासाठी म्हणून एक मोठी रक्कम नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. कमीत कमी एक हजार युएस डॉलर्स इतकी रक्कम नागरिकांच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पोहोचणार आहे. हे संकट अशाच प्रकारे सुरु राहिलं तर नागरिकांना आणखी आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांन दिली. 

अमेरिकेतील काही महत्त्वाच्या घडामोडी 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रीमंडळाकडून कोरोनाशी दोन हात करण्याचा आणि देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय तातडीने अमेरिकेच्या नागरिकांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता येत्या काळात अमेरिकेमध्ये बेरोजगारीच्या दरात २० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तेव्हा आता यामध्ये प्रशासनाचा हस्तक्षेप होणं महत्त्वाचं ठरत आहे.