कोरोनावरील लसच्या मानवी चाचणीला जर्मनीची परवानगी

या देशांत सुरु आहे कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा प्रयत्न

Updated: Apr 22, 2020, 07:14 PM IST
कोरोनावरील लसच्या मानवी चाचणीला जर्मनीची परवानगी title=

ब्युरो रिपोर्ट :  कोरोना (Covid-19) वर लस तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु असताना जर्मनीने कोरोनावरील लसची मानवी चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. जर्मनीच्या फेडरल इन्स्टिट्युट ऑफ व्हॅक्सीनने ही माहिती दिली आहे.

बायो-एन-टेक या जर्मन बायोटेक कंपनीनं विकसित केलेली ही लस पहिल्या टप्प्यात १८ ते ५५ वयोगटातील २०० सुदृढ व्यक्तिंना देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही लस किती प्रभावी ठरेल याची चाचणी या लसीकरणाद्वारे शास्त्रज्ञ करणार आहेत.

त्यानंतर आणखी काही लोकांवर पुढच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यात दुसऱ्या टप्प्यात आणि अतिधोकादायक स्थितीत असलेल्या रुग्णांवर चाचणी करण्यात येणार आहे.

तब्बल पावणे दोन लाखांवर बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसवर औषध तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. जगभरात तब्बल ८६ पथकं कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी काही पथकं चाचणी करण्याच्या टप्प्यावर आहेत.

याआधी ब्रिटनने कोरोना प्रतिबंधक लसची मानवावर चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर आता जर्मनीनेही परवानगी दिली आहे. ब्रिटनमध्येही मे च्या १५ तारखेपर्यंत ५०० स्वयंसेवक ही लस घेण्यासाठी नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे. कोरोनावरील लस संशोधनासाठी ब्रिटनच्या सरकारने २० दशलक्ष पौंड इतका निधी जाहीर केला आहे.

चीनने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनावरील दोन लसीची प्राथमिक टप्प्यावर मानवी चाचणी करण्यास प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली आहे.

 

तर अमेरिकेत आधीच मानवी चाचणी सुरु झाली आहे. अमेरिकेतील एका औषध कंपनीने अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेबरोबर कोरोनावरील लसची चाचणी मानवावर करण्यास आधीच सुरुवात केली आहे.