COVID-19 : कोरोना संसर्गाची आणखी नवीन तीन लक्षणे

आता कोव्हीड -१९च्या विद्यमान लक्षणांच्या यादीमध्ये आणखी तीन लक्षणे समाविष्ट केली आहेत. 

Updated: Jun 30, 2020, 02:34 PM IST
COVID-19 : कोरोना संसर्गाची आणखी नवीन तीन लक्षणे
संग्रहित छाया

वॉशिंग्टन : चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून, प्रभावी उपचार आणि प्रतिबंध निश्चित करण्यासाठी संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी विषाणूविषयी माहिती शोधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कोविड -१९ हा कोरोनाव्हायरस संसर्गामुळे होणारा आजार हा श्वसनाचा आजार असल्याचे समजले जात होते, परंतु नवीन माहिती पुढे येत आहे. कोरोना व्हायरसचा शरीराच्या जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. सीडीसी यूएसए, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे आता कोव्हीड -१९च्या विद्यमान लक्षणांच्या यादीमध्ये आणखी तीन लक्षणे समाविष्ट केली आहेत. सर्दी किंवा वाहणारे नाक, मळमळ आणि अतिसार या यादीमध्ये समाविष्ट केले गेले. 

यापूर्वीच या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लक्षणांमध्ये  ताप किंवा थंडी, खोकला,  श्वास घेण्यात अडचण, थकवा, स्नायू किंवा शरीरात वेदना, डोकेदुखी, वास किंवा चव गमावणे, घसा खवखवणे यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, या यादीमध्ये सर्व संभाव्य लक्षणांचा समावेश नाही. कोविड -१९ विषयी अधिक माहिती मिळाल्यामुळे सीडीसी ही यादी अद्ययावत करत राहील, असे न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना संसर्गाची नवीन तीन लक्षणे आता समोर आली आहेत. अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने कोरोनाची नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.

कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या लक्षणात तीन नवीन घटकांचाही आरोग्य विभागाने विचार करावा, असे सिडीसीने म्हटले आहे. या नवीन लक्षणांमध्ये नाक चोंदणे किंवा वाहणारे नाक, मळमळ होणे आणि अतिसारचा समावेश आहे. या तीन लक्षणांच्या आधारे आता करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे निदान करता येऊ शकणार आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोना लक्षणांमध्ये ताप, कफ, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे, अशी लक्षणे दिसत होती. त्यानंतर एप्रिलमध्ये सीडीसीने कोरोनाची नवीन सहा लक्षणे समोर आणली होती. त्यामध्ये थंडी वाजणे, थंडी वाजून अंग शहारणे, डोकेदुखी, चव किंवा स्वास संवेदना जाणे, स्नायुदुखी अशी लक्षणे होती. त्यानंतर आता सिडीसीने नाक चोंदणे किंवा वाहणारे नाक, मळमळ होणे आणि अतिसार ही लक्षणे सांगितली आहेत.