Crime News : आयफोन (iPhone) निर्मात्या अॅपल कंपनीने (Apple) मंगळवारी भारतात पहिले अॅपल स्टोर (Apple Store) सुरु केले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे अॅपलचे सीईओ टिम कुक (tim cook) यांनी भारतातील या पहिल्या अॅपल स्टोरचे उद्घाटन केले. यासह आयफोनच्या भारतातील ग्राहकांसाठी अॅपलने आपले दरवाजे उघडले आहेत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अॅपलच्या दुकानात मोठी चोरी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये चोरट्यांनी कोट्यावधींचे आयफोन चोरून नेले होते. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी भिंत फोडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील एका मॉलमध्ये ही जबरी चोरी झाली आहे. अॅपल स्टोअरमध्ये घुसून चोरट्यांनी तब्बल 500,000 डॉलर किमतीचे म्हणजेच 4,09,28,000 रुपयांचे आयफोन, आयपॅड आणि घड्याळे चोरून नेली आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील लिनवुड येथील एल्डरवुड मॉलमधील अॅपल दुकानातून चोरांनी 400 हून अधिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुकानाच्या जवळ असलेल्या एका कॉफी शॉपची भिंत फोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे.
लिनवुड पोलीस विभागातील अधिकारी मारेन मॅके यांनी सांगितले की, "एकूण अंदाजे 436 iPhone चोरण्यात आले आहेत. सुमारे 500,000 डॉलर किमतीचा माल चोरीला गेला आणि त्यामध्ये iPhones, iPads, Apple Watches आहेत." अॅपलच्या सुरक्षा यंत्रणेला बगल देत अॅपल स्टोअरच्या मागील खोलीत जाण्यासाठी चोरांनी कॉफी शॉपच्या बाथरूमच्या भिंतीला छिद्र पाडले होते. त्यातूनच चोरट्यांनी अॅपलच्या दुकानात प्रवेश केला आणि आयफोन घेऊन पळ काढला. दुसरीकडे, कॉफी मशीन स्टोअरच्या मालकाने सांगितले की मॉलमध्ये पाच वर्षांच्या व्यवसायात मी असे काहीही पाहिले नव्हते.
"दोन माणसे आमच्या एका दुकानात घुसली. त्यांनी आमच्या बाथरुमच्या भिंतीला छिद्र पाडण्यासाठी शेजारच्या अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि आणि 500,000 डॉलर किमतीचे iPhone चोरले. मला आशा आहे चोरी करणारे बदमाश पकडले जातील," असे कॉफी शॉपच्या दुकान मालकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Good morning Twitter fans! Yesterday was a weird day...
1. Two men broke into one of our retail locations. Why? To cut a hole in our bathroom wall to access the Apple Store next door and steal $500k worth of Iphones
2. Later that night on the way to the grocery store my wife… pic.twitter.com/DcUld6ULEd
— Mike Atkinson (@coffeemikeatkin) April 4, 2023
दरम्यान, अॅपलने या चोरीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज या मॉल चालवणाऱ्या कंपनीने कोमो न्यूजला सांगितले की ही एक अजब घटना आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही पाहिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून असे दिसते की यासाठी मोठी योजना आखण्यात आली होती आणि त्या आधारे ही चोरी केल्याचे दिसते. चोरट्यांनी मास्क घातले होते तसेच त्यांच्या बोटांचे ठसेही सापडले नाहीत."