इस्लामाबाद: पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने भारतातील काश्मिरी जनतेला मदत करण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या फंदात पडू नये, अन्यथा भारताला आयते कोलीत मिळेल, असा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील भाषणानंतर इम्रान खान यांनी प्रथमच काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले. इम्रान यांनी ट्विट करून यासंदर्भातील भूमिका मांडली.
या ट्विटमध्ये इम्रान खान यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील आपल्या बांधवांची अवस्था बघून काश्मिरींना (पाकव्याप्त) होणाऱ्या यातना मी समजू शकतो. मात्र, तुम्ही माणुसकीखातर मदत करण्यासाठी किंवा काश्मिरींच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडलीत तर भारताला आयता मुद्दा मिळेल, असा कांगावेखोरपणा इम्रान यांनी केला.
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या आवाहनानंतर शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरच्या विविध भागांमधून मुझफ्फराबादपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. तुम्ही काश्मिरींना मदत करण्याच्या नादात नियंत्रण रेषा ओलांडाल आणि भारताला हल्ले करण्यासाठी कारण मिळेल, असे इम्रान यांनी म्हटले आहे.
बालाकोट एअर स्ट्राईक, त्यापाठोपाठ काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व राजनैतिक संबंध तोडून टाकले होते. तसेच पाकिस्तानकडून या मुद्द्यावरून सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.
यावरून शनिवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी इम्रान खान यांना फटकारले होते. इम्रान खान हे आपल्या पदाचा आब न राखता बोलत आहेत. कदाचित त्यांना आंतरराष्ट्रीय संबंध कसे जोपासले जातात, हे माहिती नसावे. इम्रान खान यांची सध्याची वक्तव्ये पाहता, ते भारताविरोधी जिहाद करण्यासाठी जाहीर आवाहन करत असल्याचे प्रतित होत आहे. ही साधारण कृती नाही, असे रवीश कुमार यांनी सांगितले होते.