अरे बापरे... तीव्र उष्णलाटेचा या देशावर कहर, आगीमुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात

कडाक्याच्या उष्णतेमुळे कॅनडामध्ये अनेक ठिकाणी भीषण आग पसरली आहे. (Fire in Canada)  

Updated: Jul 3, 2021, 09:50 AM IST
अरे बापरे... तीव्र उष्णलाटेचा या देशावर कहर, आगीमुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात title=
Pic / AFP

मुंबई : कडाक्याच्या उष्णतेमुळे कॅनडामध्ये अनेक ठिकाणी भीषण आग पसरली आहे. (Fire in Canada) त्यामुळे 1000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दरम्यान, जोरदार उष्मा सहन करणाऱ्या कॅनडामधील आगीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. देशातील बर्‍याच भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. 

या आगीबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत प्रीमियर जॉन हॉर्गन म्हणाले की, ब्रिटीश कोलंबिया प्रांतात (British Columbia) आगीच्या 143 घटना घडल्या असून त्यापैकी गेल्या 24 तासांत 77 घटना घडल्या आहेत. ते म्हणाले की ब्रिटीश कोलंबियाच्या जवळपास प्रत्येक भागात आगीचा धोका आहे. याशिवाय व्हॅनकुव्हरपासून 250 किमी अंतरावर असलेल्या लिट्टनलाही खूप त्रास होत आहे.

हे  गाव 90 टक्के आगीच्या विळख्यात

स्थानिक खासदार ब्रॅड विन यांनी सांगितले की, लिट्टन हे गाव 90 टक्के आगीत खाक झाले आहे. येथून सुमारे 1000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.  या दिवसात कॅनडामध्ये उष्णता तीव्र होत असते. येथील तापमान 49.6 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले आहे. अति उष्णतेमुळे आगीच्या घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मदतीसाठी सैन्य पाठविले

या घटनेची माहिती देताना संरक्षणमंत्री हरजित सज्जन म्हणाले की, लिटनमधील रहिवाशांना मागील 24 तास खूप कठीण गेले. ते म्हणाले की या कठीण काळात लोकांच्या पाठिंब्यासाठी कॅनेडियन सुरक्षा दलांना पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीशी संबंधित घटनांमुळे मृत्यू किंवा जखमी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे, लिटनच्या उत्तर-पूर्वेस 150 किमी अंतरावर असलेल्या कमलूप्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अग्निशमन विभागाचा इशारा

दुष्काळ आणि अति उष्णतेमुळे पुढील समस्या कायम राहू शकतात,असा इशारा ब्रिटीश कोलंबिया अग्निशमन प्रशासनाने दिला आहे. त्याचवेळी, पर्यावरण कॅनडाने एक बुलेटिन जारी केले की, पुढील काही दिवस ब्रिटीश कोलंबियामध्ये तापमानात विक्रमी वाढ नोंदविली जाईल. लोकांना उष्णता टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पश्चिम कॅनडा व्यतिरिक्त वॉशिंग्टन आणि अमेरिकेच्या ओरेगॉन येथेही तापमानाची नोंद विक्रमी पातळीवर आहे.