Taxi Driver To Millionaire: एखादा टॅक्सी चालक कोट्यधीश झाल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना. मात्र एक टॅक्सीवाला केवळ श्रीमंतच झाला नाही तर त्याने या पैशांमधून कंपनीही सुरु केली. या टॅक्सी चालकाचं नाव आहे सलीम अहमद खान! सलीम हा मूळचा पाकिस्तानचा रहिवाशी आहे. मात्र सध्या तो संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये काम करतो. 2009 साली टॅक्सी चालक म्हणून दुबईत काम करणारे सलीम आता एका कंपनीचे मालक आहेत.
सलीम खान हे 2013 पर्यंत टॅक्सी चालक म्हणून काम करायचे. ते अगदी 2019 पर्यंत चालक म्हणून काम करत होते. त्यांनी चालक म्हणून हळूहळू पैसे जमा केले आणि नंतर स्वत:ची टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी सुरु केली. आज त्यांच्या कंपनीमध्ये 850 चालक काम करतात. संपूर्ण युएईमध्ये ही कंपनी सेवा पुरवते. कंपनीकडे सुरुवातीला 20 टॅक्सी होत्या. "मी 2013 पर्यंत टॅक्सी चालक म्हणून काम केलं. त्यानंतर मी लिमोसिन टॅक्सी सर्व्हिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2019 पर्यंत मी चालक म्हणून काम केलं," असं सलीम खान यांनी 'खलीज टाइम्स'ला दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
लाहोरचे रहिवाशी असलेले सलीम खान यांचा टॅक्सी चालक ते कंपनीचा मालक हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जात आहे. केवळ 4 वर्षांमध्ये म्हणजे 2019 ते 2023 च्या कालावधीत ते कोट्याधीश झाले आहेत. जेव्हा ते 2009 मध्ये टॅक्सी चालक म्हणून युएईमध्ये काम करायचे तेव्हा त्यांना दर महिन्याला 5 हजार दिऱ्हाम्स (1 लाख 12 हजार 267 भारतीय रुपये) वेतन मिळायचं. आज त्यांचा एकूण व्यवसाय हा 5 मिलियन दिऱ्हाम्सचा (11 कोटी रुपयांचा) आहे. 2019 साल हे त्यांच्यासाठी फार खास ठरलं. याच वर्षात त्यांनी घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमुळे आज ते एक यशस्वी उद्योगपती आहेत.
सलीम खान हे चालक असताना स्वत: 12 तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करायचे. 2013 मध्ये त्यांनी लिमोसिन कार खरेदी केली. जेवढे पैसे ते कमवायचे किंवा बाजूला काढून ठेवायचे ते स्वत:च्या बिझनेसमध्येच गुंतवायचे. कोणालाही मोठं व्हायचं असेल तर त्यानेही असं केलं पाहिजे असा सल्लाही सलीम खान यांनी दिला. सलीम यांनी टप्प्याटप्प्यात आपल्या कंपनीचा पाया रचला आणि 2019 साली किंग राइडर्स डिलीव्हरी सर्व्हिसेसची सुरुवात केली. आज त्यांच्या कंपनीने 850 जणांना रोजगार पुरवला आहे. तसेच त्यांनी एक आलिशान गाड्यांच्या माध्यमातून सेवा पुरवणारी कंपनीही सुरु केली आहे. त्यांनी 20 आलीशान गाड्या खरेदी करण्यासंदर्भातील हलचाल सुरु केली आहे. या नव्या कंपनीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. सलीम खान यांचा प्रवास खरोखरच प्रयत्नांती परमेश्वर हा म्हणीला साजेसा आहे.