मुंबई : दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी घरातील विद्युत दिवे बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ अवर दिन म्हणून ओळखला जातो. यावेळी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोकं रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद ठेवतील आणि उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकतेचा संदेश देतील.
वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर(World Wide Fund for Nature, WWF) या वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेने 2007 मध्ये अर्थ अवर डेची सुरुवात केली होती. 31 मार्च 2007 रोजी प्रथमच अर्थ अवर दिन साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हे प्रथम आयोजित करण्यात आले होते. यात लोकांना 60 मिनिटांसाठी सर्व दिवे बंद ठेवण्याची विनंती केली गेली. हळूहळू हे जगभरात साजरे होऊ लागले.
काय आहे उद्देश?
अर्थ अवर डे ही वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरची मोहीम आहे ज्याचा हेतू ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करणे आहे. वर्ल्ड वाइड फंडाचा हेतू निसर्गास होणारी हानी रोखणे आणि मनुष्याचे भविष्य सुधारणे हा आहे.
ग्लोबल वर्मिंग विरुद्ध प्रभावी शस्त्र
2009 मध्ये भारत या मोहिमेचा एक भाग झाला. आज अर्थ अवर डे एक चळवळ बनली आहे. पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर, या जागतिक मोहिमेमुळे हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंग या समस्येवर लढायला मदत करेल. अशा परिस्थितीत, तो एकाच दिवशी नव्हे तर दररोज साजरा केला पाहिजे.
भारतात कधी झाली सुरुवात?
अर्थ अवर दिनानिमित्त लोकांना रात्री 8.30 ते रात्री 9.30 या वेळेत आपली घरे आणि कामाच्या ठिकाणी गरज नसलेली उपकरणं बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. भारतात 2009 मध्ये पहिला पृथ्वी अवर डे साजरा केला गेला होता. यात 58 शहरांमधील 5 दशलक्ष लोकांनी सहभाग घेतला होता. 2010 मध्ये भारताच्या 128 शहरांमधील 7 दशलक्षाहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला. यानंतर ही संख्या वाढली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वीज वितरण कंपन्यांनी ही मोहिम यशस्वी होण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. गेल्या दहा वर्षात दिल्लीतील लोकांनी 2018 मध्ये 305 मेगावॅट विजेची सर्वाधिक बचत केली होती. 2020 मध्ये 79 मेगावॅट विजेची बचत झाली. बीएसईएसचे प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, कोरोना साथीच्या आणि हवामान बदलामुळे पृथ्वीचे संकट वाढले आहे, जे थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील.
पॅरिस स्थित आयफेल टॉवर, न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, दुबईची बुर्ज खलिफा आणि अथेन्समधील अॅक्रोपोलिस ही दरवर्षी त्या 24 जागतिक स्थळांपैकी आहेत जे दरवर्षी यामध्ये भाग घेतात. भारतात अर्थ आवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींमध्ये दिवे बंद करण्यात आले. बीएसईएस अर्थ आवर दरम्यान आपल्या 400 हून अधिक कार्यालयांमधील अनावश्यक दिवे बंद ठेवणार आहे.