वॉशिंग्टन : अमेरिकेत एशियन कार्प नावाचे मासे मोठ्या प्रमाणात वाढले. हे मासे एवढ्या प्रमाणात वाढले की त्यांच्यामुळे इतर जातीच्या माशांच्या जाती धोक्यात आल्या. त्यामुळं अमेरिकन सरकारनं या माशांना चक्क शॉक ट्रिटमेंट देऊन मारायला सुरुवात केलीय.
पाण्यात उड्या मारणारे मासे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण ही मासेमारीची नवी पद्धत आहे. मासेमारीची ही नवी पद्धत अमेरिकेत सुरू झाली आहे. अशा मासेमारीचं कारणही वेगळं आहे बरं का? त्याचं झालं असं की एशियन कार्प जातीचे मासे धरणात मोठ्या प्रमाणात वाढले. हे मासे खूप खादाड आहेत. इतर माशांना काहीच खाऊ देत नाही. एशियन कार्प माशांमुळे इतर माशांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं केंटुकी राज्यातल्या बर्कले धरणात माशांना मारण्यासाठी शॉक ट्रिटमेंट देण्यात आली.
बोटीतून दोन रॉड पाण्यात टाकल्यानंतर पाण्यातील मासे उड्या मारु लागले. झालेल्या प्रकारामुळं एक क्षण बोटीतले मासेमारही चक्रावून गेले. काही क्षणातच शॉक लागलेले मासे उताणे पडले. खरं तर शॉक दिल्यानं हे मासे मरत नाहीत. पण अर्धमेले झालेले हे मासे पकडणं सोपं जातं. १९७०च्या सुमारास अमेरिकेत एशियन कार्प माशांची बिजं आणली गेली. पण बेसुमार वाढलेल्या या माशांमुळे स्थानिक प्रजाती धोक्यात आणल्या. त्यामुळं अमेरिकन सरकारला माशांना मारण्यासाठी ही शॉक ट्रिटमेंट द्यावी लागली.
मासेमारीची ही पद्धत थोडी नवीन असली तरी त्यात अनेक धोके आहेत. तरीही मासे मारताचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.