Oxford युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसनिर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न

प्रयत्न जवळपास ८० टक्के यशाच्या मार्गावर 

Updated: Apr 24, 2020, 02:07 PM IST
Oxford युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसनिर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न title=

लंडन : Coronavirus कोरोना विषाणूचा संपूर्ण जगभरात झालेला संसर्ग, लागण होणाऱ्यांची आणि या महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या पाहता ही बाब अत्यंत चिंतेच्या वळणावर आणून ठेवत आहे. याच परिस्थितीमध्ये सर्वत्र कोरोना विषाणूची लस शोधण्यासाठीचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसुद्धा यात मागे नाही. 

सध्याच्या घडीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे. सध्याच्या घडीला लस शोधण्यासाठीच्या प्रयत्नांत असणारे एकूण सात प्रयोग हे क्लिनिकल टेस्टींगच्या टप्प्यातून पुढे आलेले आहेत. तर, काही या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. चीन आणि अमेरिकेमध्ये या चाचण्यांच्या प्रयोमगाने वेग धरला आहे. तर, जर्मनीमध्ये या महिन्याअखेरीस लस शोधण्याच्या प्रयोगांची सुरुवात होणार आहे. 

तर, इथे ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यास येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सर्वतोपरी पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी गुरुवारी दिली. जिथे या टप्प्यापर्यंत पोहोचण्यास वर्षानुवर्षांचा कालावधी लागतो तिथेच आता आश्वासक प्रगती दिसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. लसीच्या चाचणीसाठीच्या पहिल्या टप्प्यात १११२ स्वयंसेवकांना कोविड 19 विरोधातील लस दिली जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात त्याची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याची चाचणी होणार आहे. 

सध्याच्या घडीला ज्या स्वयंसेवकांचा लस चाचणी प्रक्रियेत सहभाग आहे, ते १८ ते ५५ या वयोगटातील सुदृढ व्यक्ती आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. शिवाय त्यापैकी कोणीही महिला गरोदर किंवा स्तनपान करत नसल्याची माहिती समोर येत आहे. चार आठवड्यांच्या कालावधीत त्यांना लसीच्या एकूण दोन मात्रा देण्यात येणार आहेत. 

ऑक्सफर्डकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नांमध्ये प्राचार्य सारा गिल्बर्ट यांच्या चमूने ८० टक्के यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला असून, सप्टेंबरपर्यंत लस तयार करण्याची आशा व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला विज्ञान क्षेत्रात ऑक्सफर्डमधील या प्रयत्नांचीच चर्चा सुरु आहे.
 
इथे तयार केली जाणारी लस ही, Chimpanzee adenovirus वर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. adenivirus च्या लसीच्या एकाच मात्रेने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोणत्याही प्रकारची हानीही होत नाही. त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही लस फायद्याची ठरेल. त्यामुळे आता ही लस तयार झाल्याच विज्ञानाच्या क्षेत्रातील परिसीमा ओलांडणारा हा एक चमत्कारच असेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.