Forbes Top 100 List : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union finance minister Nirmala Sitharaman) या पुन्हा एकदा भारतातील सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. फोर्ब्सच्या (Forbes) ताज्या यादीत सीतारमण यांना 37 वं स्थान देण्यात आलं आहे. फोर्ब्स मासिकाने जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. याआधी नुकत्याच जाहीर झालेल्या फॉर्च्यून इंडियाच्या यादीतही अर्थमंत्र्यांना पहिलं स्थान देण्यात आलं होतं. फोर्ब्सच्या या यादीत आणखी काही भारतीय महिलांना स्थान मिळालं आहे.
2020 च्या यादीत सीतारामन 41व्या क्रमांकावर होत्या. फोर्ब्सने सलग तिसऱ्यांदा निर्मला सीतारामन यांचा जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला आहे.
जैनेट येलेन यांना टाकलं मागे
जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण यांनी अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांना मागे टाकलं आहे. 2020 च्या यादीत जेनेट सीतारामनच्या पुढे होत्या.
या भारतीय महिलांचाही समावेश
निर्मला सीतारमण यांच्या व्यतिरिक्त HCL च्या रोशनी नाडर (Roshni Nadar Malhotra) या यादीत 52 व्या, Biocon च्या किरण मुझुमदार शॉ (Kiran Mazumdar-Shaw) 72 व्या आणि Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर (Falguni Nayar) 88 व्या स्थानावर आहेत.
मॅकेन्झी स्टॉक जगातील शक्तिशाली महिला
यादीत पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे मालक आणि जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांच्या पूर्व पत्नी मॅकेन्झी स्टॉक (MacKenzie Scott) आहेत. मॅकेन्झीने जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल (Angela Merkel) यांना मागे टाकत हे स्थान मिळवलं आहे. फोर्ब्सच्या यादीत दुसरं स्थान भारतीय वंशाच्या एका महिलेचं आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (US vice-president Kamala Harris) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.
अमेरिकन व्यवसायिक मासिक 'फोर्ब्स' दरवर्षी जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. यावर्षी, 18 व्या वार्षिक शक्तिशाली महिलांच्या यादीत, 40 महिला अशा आहेत, ज्या सीईओ पदावर काम करत आहेत. या यादीत 19 महिला नेत्यांचा समावेश आहे.