युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार तर चार जखमी

उत्तर कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात चार जण जखमी झाले असून संशयित हल्लेखोर महिला ठार झालेय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2018, 07:40 AM IST
युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार तर चार जखमी title=

सॅन ब्रुनो : उत्तर कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात चार जण जखमी झाले असून संशयित हल्लेखोर महिला ठार झालेय. दरम्यान, तिने स्वत:वर गोळी झाडल्याचे वृत्त आहे.

गोळीबारातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबारात चार जण जखमी झाल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिलाय. दरम्यान, ठार झालेल्या संशयित महिलेने गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तीन जखमींवर उपचार करण्यात येत आहे. यात एक पुरुष आणि एका महिलेची स्थिती अत्यंत नाजूक आहे. मात्र, दाखल करण्यात आलेल्या तरुणीची स्थिती स्थिर आहे, अशी माहिती सॅन फ्रान्सिस्को जनरल हॉस्पिटलचे प्रवक्ते ब्रेंट अँड्र्यू यांनी दिली. 

दरम्यान, या हल्ल्यानंतर तात्काळ युट्यूबचे मुख्यालय खाली करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात आले आहे.  

गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना त्वरीत परिसर रिकामा केला. नागरिकांना या परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी येथील परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय.