ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले 'किती क्रूरपणे...'

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भारत दौऱ्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी नाराजी जाहीर केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना द्यायला हवं होतं तितकं महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 11, 2023, 04:32 PM IST
ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले 'किती क्रूरपणे...' title=

दिल्लीत रविवारी झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह देशभरातील अनेक मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऋषी सुनक भारत दौऱ्यात फक्त जी-20 परिषदेत सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती याच्यासह अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. पण भारत दौऱ्यात ऋषी सुनक यांना योग्य ते महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने म्हटलं आहे 

ऋषी सुनक जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 8 सप्टेंबरला भारतात दाखल झाले होते. शिखर परिषदेत हजेरी लावल्यानंतर आणि अक्षरधाम मंदिरात पूजा केल्यानंतर रविवारी ते मायदेशी परतले. दरम्यान ऋषी सुनक यांच्या भारत दौऱ्यानंतर 'द गार्डियन'ने एक बातमी प्रसिद्ध केली आहे, ज्याचं हेडिंग ''ऋषी कोण आहेत? G20 मध्ये भारताच्या जवळ जाण्याच्या शर्यतीत, सुनक क्रमवारीत आणखी खाली घसरले आहेत'' असं ठेवण्यात आलं. 

पंतप्रधान मोदींनी ब्रिटीश पंतप्रधानांना महत्त्व दिलं नाही - द गार्डियन

वृत्तपत्राने बातमीत लिहिलं आहे की, "ब्रिटीश पंतप्रधान शनिवारी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. पण ही भेट एका दिवसाने आणि कोणत्याही प्रभावशाली फोटो सेशनशिवाय पार पडली. शनिवारी जेव्हा नरेंद्र मोदींची भेट झाली, तेव्हा ब्रिटीश पंतप्रधानांना अपेक्षित होती तशी ही भेट झाली नाही".

"भारत आणि ब्रिटन या जगातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात एक दिवस अगोदर म्हणजेच 8 सप्टेंबरला नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक होणार होती. पण मुत्सद्देगिरी किती क्रूर असू शकते? सुनक यांनीही याचा अनुभव घेतला. सुनक यांना पूर्णपणे उपेक्षित ठेवण्यात आलं नाही, पण अपेक्षित महत्त्व देण्यात आलं नाही".

पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या फोटो सेशनऐवजी दोन्ही नेते जेथे जी-20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तिथे भेटले. भारत मंडपम येथे या भेटीसाठी एक कक्ष उभारण्यात आला होता. याचं कारण पंतप्रधानांचं निवासस्थान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. 

वेबसाईटने असंही लिहिलं आहे की ब्रेक्झिटनंतर ब्रिटन आता जागतिक स्तरावर अधिक एकटे पडले आहे असे अनेक लोक मानतात. त्यात ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना भारतात कमी महत्त्व मिळाल्याने हा युक्तिवाद आणखी मजबूत झाला आहे. सुनक यांच्या वेळापत्रकातील बदलामुळे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेची गुंतागुंतीची व्यवस्था आणि अस्थिर राजकारण तसेच जागतिक मंचावर ब्रिटनची स्थिती देखील दिसून आली.

मात्र बैठकीनंतर ब्रिटीश पंतप्रधान उत्साहित होते. पंतप्रधान मोदींसह अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच दोन्ही देशात अनेक व्यापार करारांवर स्वाक्षरी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

ऋषी सुनक आपल्या आवडत्या हॉटेलातही जाऊ शकले नाहीत

द गार्डियनने लिहिलं आहे की, "शुक्रवारी रात्री फक्त नरेंद्र मोदींनीच सुनक यांच्यासोबतची बैठक रद्द केली नाही. व्यापार अधिकाऱ्यांच्या एका प्रतिनिधी मंडळानेही शहरातील अनेक रस्ते बंद असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव भेट रद्द केली".

ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती आपलं आवडतं हॉटेल हल्दीराम किंवा सरवना भवन येथेही जाऊ शकले नाहीत. कारण नरेंद्र मोदींच्या राजकीय शक्ती प्रदर्शनामुळे संपूर्ण शहर बंद होतं. ज्यामुळे त्यांनी इंपिरिअल हॉटेलमध्ये जेवण केलं. 

'मी भारताचा जावई'

पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा होता. त्यांनी स्वत:ला 'भारताचा जावई' असेही संबोधले. अशा परिस्थितीत त्यांचे उत्साही स्वागत अपेक्षित होते. पण दिल्लीत शहरव्यापी लॉकडाऊनमुळे फार कमी लोक सुनक यांना भेटण्यासाठी आले होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x