Helicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार

Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत.   

सायली पाटील | Updated: Jul 11, 2023, 02:14 PM IST
Helicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार title=
Helicopter missing crash in Nepal 6 people onboard crashes

Helicopter Crash In Nepal : संपूर्ण जगाचं मन सुन्न करणारी घटना नेपाळमध्ये घडली असून, इथं एका हेलिकॉप्टर अपघातात 5 जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी 6 प्रवाशांना घेऊन निघालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि आता त्याचे अपघातग्रस्त अवशेष हाती लागल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी प्रसिद्ध केली आहे. हेलिकॉप्टरमधून एकूण 6 जण प्रवास करत होते. हे सहाजण मेक्सिकन असल्याचं सांगण्यात येत असून, त्यांच्यापैकी पाचजणांचे मृतदेह सध्या सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिखु पीके ग्राम परिषद आणि दुधकुंडा नगर पालिका-2 यांच्या सीमाभागात या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. 

सध्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असले तरीही त्यांची ओळख मात्र अद्यापाही पटलेली नाही. किंबहुना हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला यामागचं कारणंही समोर येऊ शकलेलं नाही. पण, तपास यंत्रणा आणि पोलिसांनी कयास लावत पर्वतशिखर किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाशी आदळल्यामुळं हा अपघात झालेला असू शकतो. 

... आणि हेलिकॉप्टरशी असणारा संपर्क तुटला 

'द काठमांडू पोस्ट'च्या वृत्तानुसार मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजून 10 मिनिटांनी हेलिकॉप्टरनं आकाशात झेप घेतली. ज्यानंतर काही वेळातच नियंत्रण कक्षाशी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या महाव्यवस्थापकांच्या माहितीनुसार कॉल साइन 9एन-एएमवीच्या हेलिकॉप्टरशी पहिल्या पंधरा मिनिटांनंतरच संपर्क तुटला. कॅप्टन चेत गुरुंग हे या हेलिकॉप्टर उड्डाणाचं नेतृत्त्वं करत होते अशी माहिती समोर येत आहे. 

हेसुद्धा वाचा : Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

नेपाळमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेला भयंकर विमान अपघात 

इथं हेलिकॉप्टर अपघातात पाच जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर येताच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विमान अपघाताच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. जानेवारी 2023 मध्ये झालेल्या त्या विमान अपघातामध्ये तब्बल 70-72 जाणांचा मृत्यू ओढावला होता. नेपाळच्या येती एअरलाईन्सचं हे विमान सेती नदीपाशी असणाऱ्या दरीक कोसळलं होतं. अतिशय भयंकर अशा या अपघातानंतर नजीकच्या परिसरातून आगीचे लोट उसळल्याचंही पाहायला मिळालं होतं. ज्यामुळं बचावकार्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या.