close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'वाघा बॉर्डरवर कुलभूषण यांना फाशीची शिक्षा द्या', पाकिस्तानी अभिनेत्री बरळली

सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलभूषण जाधव यांच्यावर केलेले ट्विट वीणाला चांगलेच महागत पडणार आहे.

Updated: Jul 19, 2019, 02:52 PM IST
'वाघा बॉर्डरवर कुलभूषण यांना फाशीची शिक्षा द्या', पाकिस्तानी अभिनेत्री बरळली

मुंबई : सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलभूषण जाधव यांच्यावर केलेले ट्विट वीणाला चांगलेच महागत पडणार आहे. वीणा ट्विट करून कुलभूषण जाधव यांच्या फाशीची मागणी करत आहे. सोशल मीडियावर केलेल्या या मागणीनंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असा निकाल 'द हेग'मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. भारताचा हा एक मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर पाकिस्तानी जनतेमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. याचा प्रत्यय वीणाच्या ट्विटमधून आला, तिच्या वादग्रस्त ट्विटनंतर भारतीय जनतेने तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. कुलभूषण जाधव यांचे काही फोटो पोस्ट करत, कॅप्शनमध्ये तिने 'दहशतवादी आणि खूनी कुलभूषण जाधव यांच्या प्रती कोणत्याही प्रकारची सहानभुती दाखवता कामा नये. तुम्ही जे पेराल तेच उगवेल.' असे लिहले आहे.

वीणाने इतक्यावरच नमतं घेतलं नाही, तर तिने कुलभूषण जाधव यांना वाघा बॉर्डरवर फाशी देण्यात यावी असे ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. 'बिग बॉस ४' शोच्या माध्यमातून वीणा चांगलीच प्रकाशझोतात आली होती. याच दरम्यान तिचे नाव अस्मित पटेलसह देखील जोडण्यात आले होते. त्यावेळस या दोघांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.