चीनला उत्तर देण्यासाठी भारताने तैनात केली हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा

चीनचे हेलिकॉप्टर आणि विमान आता भारतीय हद्दीत आल्यास मिळणार उत्तर

Updated: Jun 28, 2020, 02:49 PM IST
चीनला उत्तर देण्यासाठी भारताने तैनात केली हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा

नवी दिल्ली : चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने वास्तविक नियंत्रण रेषेवर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहेत. पूर्व लडाखमध्ये चिनी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरची हालचाल थांबविण्यासाठी भारतीय सैन्य आणि हवाई दलाने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र तैनात केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चिनी सैन्याच्या कोणत्याही कृतीला योग्य उत्तर देण्यासाठी भारत तयार आहे. भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याची हालचाल पाहता भारताने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्या आहेत. या क्षेपणास्त्र यंत्रणा एलएसीमध्ये दौलत बेग ओलडी ते पूर्व लडाखच्या दक्षिणेकडील भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

मेच्या पहिल्या आठवड्यापासून चिनी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमान सीमेवर असलेल्या भारतीय हद्दीजवळ उडताना दिसत आहेत. 15  जूनच्या रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली आणि त्यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले. या हिंसक संघर्षानंतर चीनने सीमेवर आपले लढाऊ विमान तैनात केले आहेत. चीनने एसयू 30 आणि इतर लढाऊ विमानांची संख्या वाढवली आहे.

हा धोका लक्षात घेता भारताने चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहेत. एलएसीवर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्यानंतर चीन यापुढे भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन करू शकणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भारत-चीन सीमेवर भारतीय हवाई दल आणि सैन्याकडून पेट्रोलिंगसाठी यंत्रणासुद्धा सक्रिय केली गेली आहे. याद्वारे भारतीय हवाई क्षेत्रावरून चिनी लढाऊ विमानांना आता उडणं अवघड होणार आहे. 

भारत आणि चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. संपूर्ण जगाचं याकडे लक्ष आहे. आतापर्यंत अनेक देश भारताच्या बाजुने उभे राहिले आहेत.