जगातल्या या दिग्गज देशांना भारताकडून औषधाचा पुरवठा

आतापर्यंत ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवले

Updated: Apr 16, 2020, 08:41 PM IST
जगातल्या या दिग्गज देशांना भारताकडून औषधाचा पुरवठा title=

ब्युरो रिपोर्ट :  कोरोनाच्या साथीमध्ये जगभरात मागणी असलेले हायड्रोक्सीक्लोरोक्वीन भारत आता ५५ देशांना पुरवत आहे. विशेष म्हणजे जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेपासून ते जगभरातील अनेक दिग्गज देशांतून या औषधाला मागणी असून भारत त्यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केल्यानंतर त्याची मोठी चर्चा झाली. ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यानं आधी थोडासा वाद झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनीही हे औषध पुरवल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. त्यानंतरही या औषधाची जगभरातून मागणी वाढली आणि आतापर्यंत तब्बल ५५ देशांना भारताने हे औषध पुरवलं आहे.

अमेरिकेबरोबरच ब्रिटनलाही भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध पाठवलं आहे. याशिवाय फ्रान्स, रशिया, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, संयुक्त अरब अमिरात आदी देशांनाही भारताकडून या औषधाचा पुरवठा केला जात आहे.

भारताच्या शेजारी देशांनाही हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची गरज असून श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, नेपाळ या शेजारी देशांना भारतानं हे औषध पाठवलं आहे. याशिवाय मालदिव, मॉरिशस, इजिप्त, युगांडा, जमैका, सिरिया, जॉर्डन, केनिया, ओमान, नेदरलँड, पेरु, टांझानिया, झांबिया अशा छोट्या आणि मोठ्या देशांनाही भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा केला जात आहे.

 

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा कोरोनाविरोधात काही प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे त्याला जगभरातल्या देशांकडून मागणी आहे. प्रामुख्यानं मलेरियाच्या उपचारासाठी भारतात त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे या औषधाची निर्मिती भारतीय औषध कंपन्या करतात. कोरोनावर उपचारादरम्यान या औषधाची गरज पडत असल्याने अचानक या औषधाची जगभरातून मागणी वाढली आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप औषध निर्माण झालं नसलं तरी कोरोना रोखण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीन औषध काही प्रमाणात उपयोगी पडत असल्याचा अनुभव आहे.