पाकिस्तान : 'तेहरिक-ए-इन्साफ' पक्षाचे प्रमुख इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांनी इमरान खान यांची भेट घेतली. यावेळी भारतीय उच्चायुक्तांकडून इम्रान यांचं निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आलं.
यावेळी इम्रान यांना भारतीय उच्चायुक्तांकडून क्रिकेट बॅट गिफ्ट करण्यात आली. या बॅटवर भारतीय क्रिकेटर्सच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या भेटीवेळी द्विपक्षीय संबंधांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. ३० जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इम्रान खान यांचं निवडणुकीतल्या विजयाबद्दल दूरध्वनीवरुन अभिनंदन केलं होतं. यानंतर आता भारतीय उच्चायुक्तांनी इम्रान यांची भेट घेऊन त्यांना बॅट गिफ्ट केलीय.
दरम्यान, पाकिस्तानातील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील गावसकर यांनी निमंत्रण देण्यात आलंय. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिनेटर फैजल जावेद यांनी ट्विट करून याची माहिती देताना भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील गावसकर यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिल्याचे सांगितले.