close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या विमानाला मिळणार नवे सुरक्षा कवच

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष विमानाला लवकरच नवे कवच मिळणार आहे.

Updated: Feb 8, 2019, 11:10 AM IST
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या विमानाला मिळणार नवे सुरक्षा कवच

नवी दिल्ली - देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष विमानाला लवकरच नवे कवच मिळणार आहे. बोईंग ७७७ जातीच्या या विमानासाठी अमेरिकेकडून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा देण्यात येणार आहे. ज्यामुळे या विमानावर क्षेपणास्त्र डागण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो यशस्वी होऊ शकणार नाही. या यंत्रणेच्या साह्याने क्षेपणास्त्राचा हवेतच सामना केला जाईल. यासाठी अत्याधुनिक स्वरुपाची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा भारताला देण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षयी संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा देण्यात येईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले.

पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हवाई प्रवासासाठी 'एअर इंडिया वन' विमान वापरण्यात येते. हे विमान बोईंग ७७७ जातीचे आहे. आता अमेरिकेकडून या विमानाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा देण्यात येणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या 'एअरफोर्स वन' इतक्याच ताकदीची सुरक्षा आता 'एअर इंडिया वन'ला मिळणार आहे. यासाठी अंदाजे १९ कोटी डॉलर इतका खर्च येणार आहे. 

क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सज्ज करण्यासाठी दोन 'लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटरमेजर्स' आणि 'सेल्फ प्रोटेक्शन सूट्स' भारताला विकण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. क्षेपणास्त्रांपासून विमानाचे संरक्षण करणे हे या यंत्रणेचे प्रमुख काम असेल. ही यंत्रणा बसविण्यात आल्यानंतर स्वनियंत्रित पद्धतीने क्षेपणास्त्र हल्ल्यांना उत्तर दिले जाईल आणि विमानाचा बचाव करण्यात येईल. 

भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरुपाची यंत्रणा देण्याची मागणी भारताकडून अमेरिकेकडे करण्यात आली होती. त्याला अमेरिकेने मान्यता दिली आहे.