बगदाद : तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली.
वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार अबादी यांनी बगदाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत, इराक-सीरियाच्या सीमेवर आमच्या सुरक्षा फौजांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आम्ही घोषणा करतो की, इस्लामिक स्टेटच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. आमचे शत्रू आमची सभ्यता संपवू पाहात होते. मात्र, आम्ही एकजूटता आणि प्रामाणिकपणा दाखवत विजय मिळवला.
अबादी पुढे म्हणाले, आम्ही अल्पकाळातच विजयी झालो. इस्लामिक स्टेटने 2014मध्ये बगदादच्या उत्तर आणि पश्चिमेकडील परिसरात मोठा कब्जा केला होता. मात्र, आमच्या फौजांनी सडेतोड उत्तर देत इस्लामिक स्टेटला हुसकाऊन लावले. त्यामुळे मी आनंदाने घोषीत करतो की, इराकी सेनेचा विजय झाला असून, इराक-सीरिया सीमा आमच्या फौजांनी अधिक सुरक्षीत केल्या आहेत.
वृत्तसंस्था एपीने दिलेल्या वृत्तानुसार, अबादींच्या घोषणेनंतर त्यांच्या कार्यालयाने रविवारी विजयोत्सव साजरा करण्यासाठी सुट्टी घेतली.
दरम्यान, अबादींनी घोषणा करताच त्यांच्या घोषणेचे अमेरिकेने स्वागत केले आहे. अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्त्यांनी लिखित स्वरूपात दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की, इराकी जनता आणि त्यांच्या धाडसी सौन्याला शुभेच्छा. सैन्यांतील अनेक जवानांनी त्यांच्या प्राणाची बाजी लावली. इराकच्या यशस्वी वाटचालीसाठी तसेच, आर्थिक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अमेरिका इराकच्या नेहमीच पाठीशी असेल, असेही अमेरिकेने म्हटले आहे.