नवी दिल्ली : कट्टरतावादा विरोधात नेहमी कडक पाऊलं उचलणाऱ्या इस्राईलने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. इस्राईल सरकारच्या एका नव्या निर्णयामुळे पॅलेस्टिनींना चांगलाच धक्का बसला आहे. कट्टरतावादी पॅलेस्टिनींच्या विरोधात पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नेतन्याहू यांनी मृत्युदंड विधेयक मंजूरी केल्याने आता इस्राईलच्या सैनिकांना मारणाऱ्या पॅलेस्टिनींना मृत्यूची शिक्षा होणार आहे.
इस्राईलकडे मृत्युदंडाला मान्यता देणारा कायदा आहे. या कायद्यानुसार मृत्युदंड फक्त तीन न्यायाधीशांच्या पॅनलच्या संमतीनुसारच दिला जाऊ शकतो. इस्राईलचे सरंक्षण मंत्री अवीगडोर लिबरमॅन यांनी इस्राईल बेटेनू पक्षातर्फे हे बिल सादर केलं होतं. ज्याला नेतन्याहू यांनी समर्थन दिलं होतं. हे बिल तीन न्यायाधीशांच्या एका पॅनलद्वारे फक्त मृत्यूदंड ही अट बंद करेल. लवकरच या बिलाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या बिलाला मान्यता दिली असून लवकरच पॅलेस्टिनी कैद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारा कायदा तयार करण्यात येणार आहे. सध्या इस्राईलच्या तुरुंगामध्ये 5,640 पॅलेस्टिनी कैदी बंद आहेत.