नवी दिल्ली : जगातील पाचव्या सर्वात मोठ्या असलेल्या ब्राझीलने दिवाळीपूर्वी भारतीयांना भेट दिली आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. आता भारतीय पर्यटकांना ब्राझीलमध्ये येण्यासाठी व्हिजाची आवश्यकता नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. भारताशिवाय ब्राझील चीनी पर्यटक आणि बिझनेस टूरसाठी येणाऱ्या प्रवाशांनादेखील व्हिजा फ्री एन्ट्री देणार असल्याचं सांगितलं आहे. देशातील व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक देशांना व्हिजा फ्री एन्ट्री देणार असल्याचं ते म्हणाले.
ब्राझीलचा व्हिजा तयार होण्यासाठी आतापर्यंत १० ते १५ दिवसांचा कालावधी लागत होता. तर वर्क व्हिजा ७ ते १० दिवसांत मिळत होता. परंतु आता भारतीयांना ब्राझीलमध्ये फ्री व्हिजा एन्ट्री मिळणार आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो याच वर्षी सत्तेत आले आहेत. अनेक विकसनशील देशांतील लोकांसाठी व्हिजाची अनिवार्यता न ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
ब्राझील सरकारने यावर्षी अमेरिका, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलियातील पर्यटक आणि व्यवसायिकांसाठी व्हिजाची अनिवार्यता संपुष्ठात आणली. परंतु या देशांनी, ब्राझीलच्या नागरिकांसाठी फ्री व्हिजाची कोणतीही घोषणा केली नाही.
ब्राझीलव्यतिरिक्त फिझी, मॉरिशस, इंडोनेशिया, भूतान, सेनेगल, नेपाळ, मकाऊ या देशांकडूनही भारतीयांना व्हीजा फ्री एन्ट्री देण्यात आली आहे.