काबूल | तालिबानने (Taliban) संपूर्ण अफगाणिस्तान (Afganistan) काबीज केलंय. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह यांनी देश सोडला आहे. अशा परिस्थितीत आता अफगाणिस्तानची सूत्र कोणाच्या हातात येणार, याची जोरदार चर्चा सुरु आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी मुल्ला अब्दुल गनी बरादरची (Abdul Ghani Baradar) निवड होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण मुल्ला अब्दुल गनी बरादर नक्की कोण आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही. मुल्ला अब्दुल गनी बरादरने आतापर्यंत काय केलंय, त्याच्या इथवरच्या प्रवासाबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Know who is the Mullah Baradar who likley will be become the next President of the afganistan)
कोण आहे मुल्ला अब्दुल गनी बरादर?
मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबानचा संस्थापकीय सदस्य आहे. एकूण 4 जणांनी 1994 मध्ये तालिबानची स्थापना केली होती. यामध्ये मुल्ला अब्दुल गनी बरदारचा समावेश होता. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने अफगाणिस्तानात 2001 मध्ये कारवाया सुरू केल्या होत्या. तेव्हा मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली विद्रोह करण्यात आला होता. अमेरिकन सैन्याने मुल्ला अब्दुल गनी बरादरला अफगाणिस्तानात शोधायला सुरुवात केली. पण तो पाकिस्तानात पळून गेला होता.
अमेरिकेने मुल्ला अब्दुल गनी बरादरला फेब्रुवारी 2010 मध्ये पाकिस्तानच्या कराचीतून अटक केली. अफगाणिस्तान सरकारकडून शांततापूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 2012 पर्यंत कैद्यांची सुटका करावी, अशी मागणी केली जायची. या कैद्यांच्या यादीत अब्दुल गनी बरादरचे नाव असायचे. सप्टेंबर 2013 मध्ये अब्दुल गनी बरादरला मुक्त करण्यात आले. त्यानंतर अब्दुल गनी बरादर कुठे होता, याचा पायपोसही कोणाला नव्हता.
1990 च्या दशकात मुल्ला उमरचे विश्वासू
अफगाणिस्तानात 90 च्या दशकात तालिबानची स्थापना झाली. तेव्हा तालिबानचा प्रमुख मुल्ला मोहम्मद उमर होता. बरादर हा त्याचा विश्वासू तर होताच, सोबत जवळचे नातेवाईकही होते. म्हटलं जातं की बरादरची बहीण मुल्ला उमरची पत्नी होती. तालिबान राजवटीतील 90 च्या दशकातील तो दुसरा प्रमुख आणि कुख्यात नेता होता.
मुल्ला उमर जिवंत असताना, तो तालिबानसाठी निधी गोळा करायचा. तसेच दररोजचं कामकाज पाहायचा. तालिबानच्या स्थापनेनंतर 1994 मध्ये त्याने कमांडर आणि स्ट्रॅटेजिस्टची भूमिका घेतली.
कट्टर इस्लामवादी
मुल्ला बरदार तालिबानच्या राजवटीत कठोर निर्णयासाठी अधिक प्रसिद्ध होते. लोकशाही, स्त्रिया, आधुनिक विचारसरणी आणि प्रगत देशाबाबत त्यांचा इस्लामिक दृष्टिकोन होता. तेव्हा ते मुल्ला उमरनंतर तालिबानमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पण गेल्या काही वर्षात जेव्हा अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चा सुरू झाली, तेव्हा सरकार आणि त्याचे अधिकारीही त्यांना सहभागी करण्यासाठी आग्रही असायचे.
दुर्रानी कुळातील
इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला बरादर यांचा जन्म 1968 मध्ये उरुझगान प्रांतातील देहरावूड जिल्ह्यातील वीटमाक या गावात झाला. तो दुर्रानी कुळातील असल्याचे मानलं जाते. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई हे देखील दुर्रानी आहेत.
आपला मुद्दा पटवून देण्यात पटाईत
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत मुल्ला बरादर यांनी 1996 ते 2001 पर्यंत अनेक पदे भूषवली. ते हेरात आणि निमरुझ प्रांताचे राज्यपाल होते. पश्चिम अफगाणिस्तानच्या सैन्याचे कमांडर होते. अमेरिकन कागदपत्रांमध्ये तेव्हा मुल्ला बरादरचा उल्लेख हा अफगाणिस्तान सैन्याचे उपप्रमुख आणि केंद्रीय तालिबान सैन्याचे कमांडर म्हणून सांगितल गेलंय. तसेच इंटरपोलनुसार, ते त्यावेळी अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रीही होते.