Knowledge News: दिवसभरात तुम्ही किती बोलता? जाणून घ्या संपूर्ण आयुष्यात एक व्यक्ती किती बोलतो

बोलण्याचा विषय निघाला म्हणून सहजच विचारतो, दिवसभरात तुम्ही किती शब्द बोलता याचा कधी विचार केलाय का? 

Updated: May 20, 2022, 02:07 PM IST
Knowledge News: दिवसभरात तुम्ही किती बोलता? जाणून घ्या संपूर्ण आयुष्यात एक व्यक्ती किती बोलतो  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : दिवस सुरु झाल्या क्षणापासून ते दिवस संपेपर्यंत आपण या न त्या निमित्तानं, काही कारणानं सतत बोलत असतो. काही लोक तर इतके बडबडे असतात, की त्यांना शांत रहा, असं म्हटलं तरीही शिक्षा दिल्यासारखंच वाटतं. काहीजण मात्र फारच मितभाषी असतात. (Knowledge News how many words do you speak in a single day )

ही मंडळी काही बोलली नाहीत, तरीही त्यांच्या मनात आणि डोक्यात मात्र बऱ्याच गोष्टींची समीकरणं सुरु असतात हे नाकारता येत नाही. व्यक्तीच्या आयुष्यात बरेच बदल घडतील. पण, त्यांच्या बोलण्याच्या सवयी मात्र काही केल्या बदलणार नाहीत हेसुद्धा तितकंच खरं. 

बोलण्याचा विषय निघाला म्हणून सहजच विचारतो, दिवसभरात तुम्ही किती शब्द बोलता याचा कधी विचार केलाय का? नसेल केला.... किंवा मग केला असेलही पण, या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, म्हणून मग ते शोधण्याचा प्रयत्नही केला नसेल. 

लिंक्डइन लर्निंग इंस्ट्रक्टर (LinkedIn Learning Instructor) Jeff Ansell Research यांच्या मते दिवसभरात प्रत्येक व्यक्ती सरासरी 7000 शब्द बोलते. काहींचं प्रमाण याहून कमी किंवा जास्तही असू शकतं. 

आयुष्यभरात किती बोलणं होतं? 
आश्चर्य वाटेल, पण सरासरी आयुष्यात कोणतीही व्यक्ती 860,341,500  म्हणजेच जवळपास 86 कोटी शब्द बोलतो. ब्रिटीश लेखक आणि ब्रॉडकास्टर Gyles Brandreth यांच्या The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. 

डिक्शनरीशी तुलना
शब्दांची तुलना जर तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीशी करत आहात तर, एखादी व्यक्ती Oxford English Dictionary च्या 20 व्या आवृत्तीला 14.5 वेळा वाचतो. व्यक्तीनं बोललेल्या शब्दांची तुलना बायबलशी केल्यास King James Bible मध्ये जितके शब्द आहेत मनुष्य प्रजाती त्याच्या 1110 पट अधिक शब्द एका आयुष्यात बोलते. आहे की नाही ही आकडेवारी कुतूहलपूर्ण? 

ही माहिती तुम्हाला कळली. पण, आता हीच माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांपर्यंतही पोहोचवायला हवी ना? त्यांना हा अफलातून प्रश्न एकदा विचारूनच पाहा....