Man Killed Woman With Face Mask: एका तरुणाने महिलेचा अगदी ब्रिटनपासून पाकिस्तानपर्यंत पाठलाग करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव हिना बशीर असून ती केवळ 21 वर्षांची होती. तर आऱोपीचं नाव मोहम्मद अर्सलान असं असून तो 27 वर्षांचा आहे. ही सूटकेस या मुलाने तो काम करत असलेल्या इंडस्ट्रीयल एरियामध्येच फेकून दिली.
हिना ही मूळची पाकिस्तानचीच होती. हिना बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती. आरोपी मोहम्मद अर्सलान मागील बऱ्याच काळापासून तिचा पाठलाग करत होता. हिना माझी प्रेयसी आहे असंही तो त्याच्या मित्रांना सांगायचा. अर्सलानने कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या मास्कच्या मदतीने हिनाची हत्या केली. हिनाच्या तोंडात मास्क कोंबल्याने तिचा श्वास कोंडला. गुदमरुन हिनाचा मृत्यू झाला. अर्सलानच्या राहत्या घरातच त्याने हिनाला संपवलं. हिनाला मारल्यानंतर एका मित्राला खोटी माहिती देऊन त्याच्या कारमधून तो मृतदेह आपल्या ऑफिसजवळ घेऊन गेला आणि तिथेच त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली.
अर्सलानने कोर्टासमोर या गुन्ह्याची थेट कबुली दिलेली नाही. मात्र आपल्याला हिनाला जीवे मारायचं नव्हतं असं तो म्हणाला. आपल्याकडून चुकून हिनाची हत्या झाल्याचं त्याने कोर्टाला सांगितलं. कोर्टात देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी जुलै महिन्यात हिना अर्सलानच्या घरी गेली होती. अर्सलान या घरात नुकताच शिफ्ट झालेला. तर याच घरात हिनाचं काही सामना राहिल्याने ती ते घेण्यासाठी आली होती. मात्र त्यानंतर हिना कधीच दिसली नाही. काही दिवसांनंतर तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये सापडला. पोलिस तपासामध्ये अर्सलान हिनाच्या मागे लागला होता अशी माहिती समोर आली. हिना नोव्हेंबर 2021 साली आपलं शिक्षण पूर्ण करुन स्वत:च्या गावी परतली होती. अर्सलानही त्याच गावात राहायचा.
सीसीटीव्हीमध्ये अर्सलान एक मोठी सूटकेस घेऊन घराबाहेर पडताना दिसून आला. त्याने ही सूटकेस एका निर्जनस्थळी फेकून दिली. हिनाचा फोन पोलिसांनी तपासला असता ती आणि अर्सलान संपर्कात असल्याचं उघड झालं. हिना आणि अर्सलानच्या चॅटमध्ये त्याने तिला लग्नासाठी मागणी घातल्याचंही पोलिसांना समजलं. या प्रकरणात कोर्टाने अर्सलानला पोलिस कोठडी सुनावली असून पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. मात्र या प्रकरणाची सध्या संपूर्ण पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु आहे. ज्या निर्दयीपणे अर्सलानने हिनाची हत्या केली त्याबद्दल सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अर्सलानला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी हिनाच्या नातेवाईकांनी केली आहे.