'अस्वस्थ' मसूद अजहर पाकिस्तानातच, पाक मंत्र्यांची कबुली

'कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत'

Updated: Mar 1, 2019, 08:29 AM IST
'अस्वस्थ' मसूद अजहर पाकिस्तानातच, पाक मंत्र्यांची कबुली  title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला. या दरम्यान पाकिस्ताननं या हल्ल्याचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अजहर याच्याबद्दल गप्पच राहणं पसंत केलं होतं. परंतु, आता मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची कबुली दिलीय. इतकंच नाही, तर मसूद खूप अस्वस्थ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. न्यूज चॅनल सीएनएनशी बोलताना कुरेशी यांनी हे वक्तव्य केलंय. 

पाकिस्तानलाही पुढे जायचंय, असं यावेळी सीएनएनशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलंय. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा तणाव आणखी वाढला असंही त्यांनी म्हटलं. 

मसूद अजहरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, 'कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत. जर भारताकडे पुरावे असतील तर बसा आणि चर्चा करा... कृपया संवाद सुरू करा आणि आम्हाला तर्कशीलपणा दाखवा'

माझ्या माहितीनुसार, मसूद अजहर पाकिस्तानातच आहे. तो अस्वस्थ आहे. तो इतका अस्वस्थ आहे की आपलं घरही सोडू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.