नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या १३,५०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याला आता एन्टीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनीही 'भामटा' म्हटलंय. चोकसीला एन्टीगुआमध्ये ठेवण्याचा आणि शरद देण्याचा कोणताही विचार नाही. भारतीय चौकशी यंत्रणा चोकसीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असंही पंतप्रधान ब्राऊन यांनी म्हटलंय. त्यामुळे एन्टीगुआमध्ये शरण घेतलेल्या मेहुल चोकसीचे धाबे दणाणलेत.
संयुक्त राष्ट्र संमेलनात भाग घेण्यासाठी पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी, 'मला पुरेशी माहिती मिळालीय की मेहुल चोकसी एक 'भामटा' आहे. न्यायालयात त्याच्याविरुद्ध प्रकरण सुरू आहे. आता तरी आम्ही काही करू शकत नाही परंतु, एवढं मात्र नक्की सांगेल की मेहुल चोकसीला एन्टीगुआ आणि बारबुडामध्ये ठेवण्याचा आमचा मानस नाही. भारतीय चौकशी यंत्रणा चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आहेत. परंतु, चोकसीचीही यासाठी संमती असायला हवी' असं ब्राऊन यांनी स्पष्ट केलं.
'मेहुल चोतसी विश्वासघातकी आहे. त्याच्याबद्दल अगोदरच माहिती असती तर एन्टीगुओचं नागरिकत्व त्याला दिलंच गेलं नसतं. तो एन्टीगुओच्या सन्मानात कोणतीही भर घालत नाही त्यामुळे त्याला भारताकडे सोपवण्यात कोणताही आक्षेप नाही. मेहुलनं आमच्या देशाच्या न्यायालयातही दाद मागितलीय. त्याची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही. परंतु, न्यायालयात हे प्रकरण संपुष्टात आल्यानंतर त्याला भारताकडे प्रत्यार्पित करण्यात येईल' असंही ब्राऊन यांनी म्हटलंय.
ब्राऊन यांनी याआधीही आपला देशात गुन्हेगारांसाठी सुरक्षित जागा बनू देणार नसल्याचं म्हटलं होतं. तसंच चोकसीचं एन्टीगुआ आणि बारबुडाचं नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल असंही आश्वासन दिलं होतं.