जर्मनीत आघाडीचे सरकार येण्याची शक्यता

अपेक्षेप्रमाणे राष्ट्राध्यक्षा एंजेला मार्केल यांनी निवडणूकीत बाजी मारली. पण, त्यांचा पक्ष पूर्ण बहुमत मिळवण्यास अपयशी ठरला. त्यामुळे जर्मनीत आघाडी सरकार सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 25, 2017, 09:06 PM IST
जर्मनीत आघाडीचे सरकार येण्याची शक्यता title=

बर्लिन : जगातील प्रमुख देशांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या जर्मनीत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. अपेक्षेप्रमाणे राष्ट्राध्यक्षा एंजेला मार्केल यांनी निवडणूकीत बाजी मारली. पण, त्यांचा पक्ष पूर्ण बहुमत मिळवण्यास अपयशी ठरला. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून, जर्मनीत बहूपक्षीय (आघाडी) सरकार सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुणासोबत होणार आघाडी?

दरम्यान एंजेला मार्केल यांची कॉझर्वेटीव्ह पार्टी आणि सोशल डेमॉक्रेटीक पार्टी (एसपीडी) यांच्यात ही आघाडी होण्याची शक्यता अधिक असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसपीडीच्या काही प्रमुख मागण्यांना मार्केल यांच्या पक्षाने सहमती दिल्यास ही आघाडी आकाराला येऊ शकते. 

मार्केलबाईंनी सहमती दर्शवली तरच...

एसपीडीचे नेते नील्स एनेने यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जगासमोर असलेल्या काही प्रमुख आव्हानांचा विचार करता जर्मनीत समविचारी पक्षांचे सरकार सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आघाडीचा पर्याय उपलब्ध असून, त्याच्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही, असेही एनेन यांनी म्हटले आहे. मात्र, चार वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी एसपीडीसारख्या पक्षासोबत आघाडी करण्याबाबत स्वत: मार्केल यांच्या मनात काय आहे, यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे. 

राष्ट्रपतींच्या सूचनेचा आदर...

जर्मनीत राष्ट्राध्यक्षपदासाठी सप्टेबरमध्ये निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत राष्ट्राध्यक्ष मार्केल यांच्या पक्षाने सर्वाधीक जागा जिंकत बाजी मारली. पण, स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाले नाही. त्यातच निवडणूकीमध्ये गेल्या 70 वर्षांतील सर्वात खराब कामगिरी करत मोठा पराभव पत्करत Left Central Party असलेल्या एसपपीडीने विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केली. मात्र, जर्मनीचे राष्ट्रपती फ्रॅंक-वॉल्टर  स्टीनमियर यांनी एसपीडीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची सूचना केली. 

मार्केलबाईंचा तो प्रयत्न फसला...

दरम्यान, कॉझर्वेटीव्ह पक्ष आणि इतर छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न एंजेला मार्केल यांनी प्रयत्न करून पाहिला. पण, त्याला यश आले नाही. त्यानंतर एएसपीडीचे नेते मार्टीन शुल्ज यांनी एंजेला मार्केल यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचे तसेच, सरकार चालविण्यासाठी सहकार्य करण्याचे अश्वासनही दिले. मात्र, अद्याप बोलणी सुरू आहेत. मार्केल यांनी सहमती दर्शवल्यास एसपीडी सोबत कॉझर्वेटीव्ह पक्षाचे सरकार पुन्हा एकदा जर्मनीवर राज्य करू शकते.